विस्तवाशी खेळू नका, हात पोळून घ्याल!; उचापतखोरांना सुप्रीम कोर्टाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 02:51 AM2019-04-26T02:51:37+5:302019-04-26T02:52:05+5:30
न्यायसंस्थेस वेठीसही धरता येते असा समज काही दांडगटांनी व धनदांडग्यांनी करून घेतला असेल तर ती त्यांची फार मोठी चूक आहे. ते विस्तवाशी खेळत आहेत. त्याने त्यांचेच हात पोळतील.
नवी दिल्ली : देशाच्या कानाकोपऱ्यातून रिमोट कंट्रोलने सूत्रे हलवून, हवा तसा न्याय विकत घेता येतो, त्यासाठी न्यायसंस्थेस वेठीसही धरता येते असा समज काही दांडगटांनी व धनदांडग्यांनी करून घेतला असेल तर ती त्यांची फार मोठी चूक आहे. ते विस्तवाशी खेळत आहेत. त्याने त्यांचेच हात पोळतील. न्यायसंस्था त्यांना पुरून उरेल, असा सज्जड इशारा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. न्यायालयाच्या देखरेखीखाली ‘एसआयटी’ नेमून या प्रकरणाचा तपास केला जावा, असा आग्रह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता धरू लागले, तेव्हा न्या. मिश्रा कडाडले, काय करायचे ते तुम्ही आमच्यावर सोपवा. प्रत्येक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीस येण्याच्या आधी काही मंडळी त्यात लुडबुड करण्यासाठी न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये खेटे घालत असतात. पण कोणीही पैशाच्या आणि राजकीय ताकदीच्या जोरावर
सर्वोच्च न्यायालयास हवे तसे नाचवू शकणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा. या प्रकरणाच्या तपासाशी सरकारचा संबंध ठेवू नका. तसेच
अॅड. बैन्स यांची पार्श्वभूूमीही तपासा, असे सुचविण्यासाठी ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग उभ्या राहिल्या. त्यांना थांबवत न्या. मिश्रा म्हणाले, आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका. न्यायालय वकीलमंडळींचे आहे. आम्ही न्यायाधीश येतो आणि जातो! फली नरिमन, नानी पालखीवाला, पराशरन अशा दिग्गजांनी ही संस्था उभारली आहे. पण येथे रोज ‘बेंच फिक्सिंग’चे वा अन्य गैरप्रकार कानावर येतात. मोठ्या केसची सुनावणी असल्यास पत्रे लिहिली जातात. पैशाच्या जोरावर काही लोक रजिस्ट्रीमध्ये सूत्रे हालविण्याचे प्रयत्न करतात. हे अति होत आहे. हे नक्कीच थांबायला हवे. आम्ही हे थांबविणार हेही नक्की.
न्यायमूर्ती झाले उद्विग्न
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याशी असभ्य वर्तन केले जाण्यामागे फार मोठे कारस्थान आहे, या अॅड. उत्सवसिंग बैन्स यांच्या दाव्याच्या अनुषंगाने न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत आपली उद्विग्नता व्यक्त केली.