नोकऱ्या देत नसाल राजीनामा द्या- उद्धव ठाकरे
By admin | Published: February 1, 2017 07:02 PM2017-02-01T19:02:34+5:302017-02-01T19:02:34+5:30
रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 1 - रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली. मराठी तरुणांवर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बुलेट ट्रेनची स्वप्ने नको, आधी नोकऱ्या द्या. आजपावेतो भकडकथा भरपूर ऐकल्या. जमत नसेल तर प्रभू यांनी मंत्रिपद सोडावे. उद्धव म्हणाले की, दिल्लीत ज्या मराठी युवकांवर लाठीहल्ला झाला त्यांच्याबाबत सेनेला सहानुभूती आहेच. शिवसेनेचे खासदार खैरे, अडसूळ संसद मार्ग पोलीस स्थानकात सर्वप्रथम पोहोचले आणि त्यांनी या युवकांची विचारपूस केली.
भाजपावर हल्लाबोल
भाजपावर हल्लाबोल करताना ते शिडीसारखा वापर करतात, आणि माडीवर चढल्यावर शिडीवर लाथ मारतात, असे म्हटले आहे. लाचारी पत्करुन आम्हाला सत्ता नको असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर गोव्यात भाजपने मगोपला संपविण्याचा डाव रचल्याचा आरोपही केला.
गोव्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली
मधल्या काळात शिवसेनेने गोव्याकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष केले, अशी प्रांजळ कबुली देताना उद्धव म्हणाले की, आपल्या विचारांची माणसे दुसऱ्या राज्यात जर काम करत असतील तर त्यांना अडचण येऊ नये म्हणून मध्ये पडलो नाही. भाजपला अडथळा नको म्हणून दुर्लक्ष केले पण भाजपने तत्त्वांना सोडचिठ्ठी देत गोमंतकीय जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते म्हणाले की, मगोपबरोबर युती व्हावी असे बाळासाहेबांना नेहमीच वाटत होते. १९९0 च्या दशकात म्हापशात मोठी सभा घेतली त्यावेळी त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती परंतु दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.
अर्थसंकल्पाबाबत कडवी प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना उध्दव यांनी केंद्र सरकार मनमानी निर्णय घेत असल्याचा आरोप केला. गतवर्षीच्ी आश्वासने पूर्ण करु शकत नसाल तर अर्थसंकल्पाची गरजच काय, याचसाठी का बहुमत मागता? असा खडा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात कुठे केली होती, असा सवाल त्यांनी केला. बँकांमध्ये लोकांनी जे पैसे भरले त्यातून कर्जे बुडविणाऱ्यांचे पैसे फेडून घेण्यात आले. देशाची तिजोरी रिकामी केली. हे असेल चालू राहिले तर पुढील पाच वर्षात भिकेचा कटोरा घेऊन फिरावे लागेल. शिवसेनेने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. आयकर मर्यादा ५ लाखांवर न्यावी, ज्येष्ठ नागरिकांना कायम ठेवींवर व्याज वाढवून द्यावे, अशी मागणी केली होती. गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देणार काय, या प्रश्नावर उध्दव यांनी आधी सरकार द्या, आणि काय करतो ते नंतर पाहा, असे उत्तर देताना जनतेला हव्या आहेत त्या गोष्टी करीन, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेले उ व यानी मगोपचे सुदिन ढवळीकर, गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गोव्यात हे तिन्ही पक्ष युतीने निवडणूक लढवित आहेत. ढवळीकर यांनी २४ जागा युतीला मिळतील, असा दावा केला. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत असताना शिवसेनेची गोव्यात वेगळी भूमिका का, या प्रश्नावर उध्दव म्हणाले की, काँग्रेस नको म्हणून नाईलाजाने आम्ही या दोन्ही ठिकाणी भाजपबरोबर आहोत. मात्र असे असेल तरी सत्तेवर अंकूश ठेवण्याचे काम करतोय.