‘मी याचना करतो’ असे म्हणू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 03:49 AM2017-12-30T03:49:46+5:302017-12-30T03:50:23+5:30
नवी दिल्ली : सरकारी दस्तऐवज सभागृहात मांडताना मंत्र्यांनी ‘हे दस्तऐवज सादर करू देण्याची मी याचना करतो’, अशी भाषा वापरू नये याचे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्मरण दिले.
नवी दिल्ली : सरकारी दस्तऐवज सभागृहात मांडताना मंत्र्यांनी ‘हे दस्तऐवज सादर करू देण्याची मी याचना करतो’, अशी भाषा वापरू नये याचे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्मरण दिले.
सभागृहात सरकारी दस्तऐवज मांडताना ‘आजच्या कार्यसूचीत माझ्या नावे दाखविलेले दस्तऐवज सभागृहात मांडू देण्याची मी याचना करतो’, अशी भाषा वापरण्याची प्रथा रूढ आहे. परंतु १५ डिसेंबर रोजी नायडू यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी साम्राज्यवादी गुलामगिरीची भाषा सोडून देण्याची सूचना केली होती. त्याऐवजी मंत्र्यांनी, ‘मी हे दस्तऐवज सभागृहात मांडण्यासाठी उभा आहे,’ असे म्हणावे असे त्यांनी सुचविले होते.
शुक्रवारी विधि राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी सभागृहात दस्तऐवज मांडताना ‘याचना करतो’, असे म्हटले तेव्हा सभापती नायडू यांनी आपण आधी केलेल्या सूचनेची आठवण करून दिली. कदाचित मी याआधी ही सूचना केली तेव्हा मंत्री चौधरी हजर नसावेत, असे म्हणून नायडू यांनी त्यांना ‘कृपया याचना करतो, असे म्हणू नका’, असे सांगितले. नुसते उभे राहून, मी हे दस्तऐवज सभापटलावर मांडत आहे, असे म्हटले तरी पुरेसे आहे. ‘याचना’ शब्द वापरण्याचे टाळले तर चांगले, असे ते म्हणाले.
बसल्या जागेवरून न बोलण्याचीही सभापतींनी सदस्यांना समज दिली व एखाद्या हेडमास्तरच्या शिस्तीने त्यांनी सदस्यांनी विषय सोडून अवांतर बोलू नये, असेही सांगितले.
>कटुतेला पूर्णविराम
नायडू यांनी
कालच्या कामकाजातील
एका प्रसंगाचा
उल्लेख केला. काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांनी काही टिप्पणी केली होती. नायडू म्हणाले की, संबंधित सदस्य आज सकाळी मला भेटले व आपल्याला सभापतींविषयी नितांत आदर आहे व ते शब्द भावनेच्या भरात आपल्या तोंडातून निघून गेले, असे त्यांनी सांगितल्यावर आपण त्या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचे ठरविले आहे.