"वंदे मातरम म्हणा नाहीतर चालायला लागा"
By admin | Published: March 30, 2017 09:13 AM2017-03-30T09:13:16+5:302017-03-30T09:14:04+5:30
राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणा अन्यथा तुम्हाला संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवेश किंवा उपस्थित राहू दिलं जाणार नाही अशी घोषणा मेरठ महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 30 - राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणा अन्यथा तुम्हाला संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवेश किंवा उपस्थित राहू दिलं जाणार नाही अशी घोषणा मेरठ महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी केली आहे. महापालिकेच्या सर्व सदस्यांना हा नियम लागू करण्यात आला असून पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही घोषणा करण्यात आल्यानंतर संचालक मंडळातील काही मुस्लिम सदस्यांनी आपला विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती देत वंदे मातरम म्हणणं अनिवार्य नसल्याचं सांगितलं.
उत्तर प्रदेशात भाजपा सत्तेवर आल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला.
मेरठ महापालिकेत अगोदपासूनच राष्ट्रीय गीत सादरीकरण होत आहे. मात्र ज्यांना सहभागी होण्याची इच्छा नसे त्यांना हॉल सोडून जाण्याची परवानगी होती. राष्ट्रीय गीत संपल्यानंतर त्यांना पुन्हा हॉलमध्ये प्रवेश दिला जाई. मात्र मंगळवारी जेव्हा काही नगरसेवकांनी हॉल सोडून जाण्यास सुरुवात केली तेव्हा भाजपा सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावच लागेल अशा घोषणा भाजपा सदस्यांकडून करण्यात आल्या.
यानंतर महापालिकेतील वातावरण चांगलंच तापलं आणि शाब्दिक चकमक सुरु झाली. यानंतर महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी मध्यस्थी करत वंदे मातरम म्हणायचं की नाही यासाठी आवाजी मतदान घेत ठराव संमत केला. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून मंजूरी मिळणं गरजेचं आहे.
"आपल्या मातृभूमीचा असलेला आदर दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. जेव्हा महापालिकेत मुस्लिम आयुक्त होते तेव्हाही वंदे मातरम म्हटलं जायचं. मग आता हा सगळा वाद कशासाठी ?", असा सवाल आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी विचारला आहे.
80 सदस्यांच्या महपालिकेत भाजपाचे 45 नगरसेवक असून 25 मुस्लिम नगरसेवक आहेत. महापालिकेतील मुस्लिम नगरसेवक दिवान शरीफ यांनी "वातावरण खूपच तापलं असल्याने आम्ही सुरक्षितपणे बाहेर पडलो. आम्हाला खुप दुख: झालं आहे. आमच्या पुर्वजांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे", अशी प्रतिक्रिया दिली आहे.