डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही!, विरोधक म्हणजे शल्यवृत्तीचे टीकाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:49 AM2017-10-05T05:49:59+5:302017-10-05T05:50:22+5:30
गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला.
नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला. डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मागील व आताच्या सरकारच्या काळातील आकडेवारी देत त्यांची ओरड बिनबुडाची असल्याचा दावा केला.
‘इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरीज् आॅफ इंडिया’च्या कार्यक्रमात मोदींच्या भाषणाचा मुख्य रोख गेल्या काही दिवसांत सरकारवर टीका करणाºया विरोधकांवर व स्वपक्षीयांवरही होता. टीका करणारे हे लोक गैरसोयीचे असते, तेव्हा सरकारच्या आकडेवारीवर शंका घेतात आणि सोयीचे असते तेव्हा तीच आकडेवारी ब्रह्मवाक्य मानून टीका करतात, असे ते म्हणाले. व्यासपीठावर मोदी यांनी भाषणात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्याची आकडेवारी तक्त्याच्या स्वरूपात दाखविण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती.
सरकार प्रामाणिकांच्या पाठीशी
मोदी म्हणाले, देशाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत प्रामाणिकांची कदर केली जाईल. व्यापाºयांना भूतकाळातील कुलंगडी तर बाहेर काढली जाणार नाहीत, याची भीती असल्याची मला कल्पना आहे. परंतु त्यांच्यामागे शुल्ककाष्ठ लावले जाणार नाही. जीएसटीच्या व्यवस्थेत देशहितासाठी जे काही बदल व सुधारणा करणे गरजेचे असेल, ते सरकार नि:संकोचपणे करेल.
भाषणात महाभारतातील ‘शल्य’
मोदी म्हणाले की, महाभारतात शल्य नावाचे एक पात्र होते. शल्य हा कर्णाचा सारथी होता. युद्धात जे काही दिसायचे ते पाहून हा शल्य कर्णाला एकसारखा हतोत्साहित करत असे. नैराश्याचे वातावरण पसरवीत असे. आज शल्य नसला तरी शल्यवृत्ती कायम आहे. अशा लोकांना नैराश्य पसरविण्यातच आनंद मिळतो. एखाद-दुसºया तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर कमी झाला तरी त्यांच्यासाठी ती मोठी बातमी होते.
पंतप्रधानांनी मांडला आकडेवारीचा फ्लॅशबॅक
मी कोणी अर्थतज्ज्ञ नाही किंवा मी
तसा दावाही केलेला नाही; पण आज देशात अर्थव्यवस्थेवर एवढी चर्चा होत असताना मला जरा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाण्याखेरीज गत्यंतर नाही.
सातत्याने सात टक्क्यांहून वृद्धीदर असलेल्या अर्थव्यवस्थेचा विकास दोन तिमाहींत ५.७ व ६.१ टक्के झाल्यावर टीका सुरूझाली. परंतु विकासदर या पातळीवर येण्याची ही पहिली वेळ नाही.
पूर्वीच्या सरकारच्या काळात आठ वेळा विकासदर ५.७ टक्के वा त्याहून खाली होता. काही वेळा तर तर तो ०.२ टक्के ते १.५ टक्के एवढाही घसरला होता.
घामाचा पैसा सुरक्षित
नागरिकांनी घाम गाळून कमावलेल्या प्रत्येक पैशाची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गाचे जीवन सुसह्य करण्यासोबतच त्यांचे पैसेही वाचावेत हे डोळ्यांपुढे ठेवूनच सरकारची धोरणे व योजना राबविल्या जात आहेत. वर्तमानाच्या चिंतेने देशाचे भविष्य वाºयावर न सोडण्याचे भान सरकारला आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान