धर्माच्या नावाने हिंसाचार नको - नरेंद्र मोदी
By admin | Published: May 15, 2016 05:16 AM2016-05-15T05:16:31+5:302016-05-15T05:16:31+5:30
धर्म ही लोकांना जोडणारी शक्ती असून जगभरातील सर्व धर्म, पंथ, संप्रदायांच्या प्रमुखांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करावा
निनोरा (मध्य प्रदेश) : धर्म ही लोकांना जोडणारी शक्ती असून जगभरातील सर्व धर्म, पंथ, संप्रदायांच्या प्रमुखांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करावा, असे आवाहन सिंहस्थ २०१६ च्या घोषणा पत्रात करण्यात आले
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी येथे उज्जैन सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ’च्या समारोपप्रसंगी हे घोषणापत्र जारी करण्यात आले. याप्रसंगी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना उपस्थित होते.
मोदी म्हणाले की, दहशतवाद आणि तापमान वाढ या जगापुढील भीषण समस्या आहेत आणि भारतीय संस्कृती या समस्यांचा सामना करण्यास समर्थ आहे. माझा मार्ग तुझ्या मार्गापेक्षा योग्य आहे, ही भावना या समस्येच्या मुळाशी असून ही भावना आणि विस्तारवाद जगाला संघर्षाच्या खाईत लोटत आहे. या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चासत्र होत असताना अपयशच पदरी पडत आहे. परंतु आम्हा भारतीयांमध्ये संघर्ष व्यवस्थापनाची क्षमता जन्मजातच असते. त्यामुळे आम्ही जगाला मार्ग दाखवू शकतो. कुंभमेळ्याचे योग्य मार्केटिंग करून जास्तीतजास्त पर्यटकांना आकर्षित करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. (वृत्तसंस्था)