मणिपूरमध्ये बंद व नाकेबंदी नको, हवीय रोजगार संधी
By admin | Published: February 24, 2017 01:40 AM2017-02-24T01:40:53+5:302017-02-24T01:40:53+5:30
मणिपूरमध्ये पहिल्यांदाच मताचा हक्क बजावणाऱ्यांना राज्यातील नाकेबंदी आणि बंदचे राजकारण संपावे, असे वाटते
इम्फाळ : मणिपूरमध्ये पहिल्यांदाच मताचा हक्क बजावणाऱ्यांना राज्यातील नाकेबंदी आणि बंदचे राजकारण संपावे, असे वाटते. त्यांनी आम्हाला चांगले शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळावी अशी मागणी केली आहे.
येथील ज्या ज्या युवकांशी संवाद साधला त्यांनी त्यांना आर्थिक नाकेबंदी बंद होऊन हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये शांतता स्थापन व्हावी, असे सांगितले. मी माझ्या लहानपणापासून राजकीय असंतोष, नाकेबंदी आणि व्यवहार बंद याबद्दलच ऐकत आलो आहे. जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण होतील व शैक्षणिक संधी उपलब्ध होतील या दृष्टीने आम्ही हे रक्तपाताचे दिवस मागे टाकून पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका विद्यार्थ्याने सांगितले.
एकदा नाकेबंदी केली तर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, स्कूटर चालवायलाही आम्हाला इंधन मिळत नाही. पर्यायाने आमचे दैनंदिन जीवन कोलमडून पडते. आम्हा सर्र्वाना आमच्या राज्यात शांतता आणि समृद्धी हवी आहे. आम्हाला रोजरोजची नाकेबंदी आणि अस्वस्थता नको आहे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
ईशान्येकडील या राज्यामध्ये बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न आहे. बहुतेक युवकांना मणिपूरचा विकास माहिती व तंत्रज्ञान व शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनावे, असे वाटते. (वृत्तसंस्था)
तरुण अन्य राज्यांत जात आहेत
मणिपूरमध्ये एक नोव्हेंबर २०१६ पासून युनायटेड नागा कौन्सिलने (यूएनसी) आर्थिक नाकेबंदी व बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने सात नवे जिल्हे तयार करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला या आंदोलनाद्वारे विरोध केला जात आहे.
या आंदोलनामुळे इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या राज्यातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तरुण मतदारांची मागणी रोजगारांची संधी आणि चांगले शिक्षण मिळण्याची आहे. त्यापैकी अनेक जण मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा बंगळुरूला जातात.
बहुतेक युवक त्यांचे उच्च माध्यमिक किंवा पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मणिपूर सोडतात कारण मणिपूरमध्ये चांगल्या म्हणता येतील अशा शिक्षणाच्या सोयी किंवा रोजगारही नाही, असे बी. शरद या पहिल्यांदाच मतदान करणाऱ्याने सांगितले.