मोदी फक्त बोलू नका, करुन दाखवा - असदुद्दीन ओवेसी
By admin | Published: June 29, 2017 04:47 PM2017-06-29T16:47:55+5:302017-06-29T17:10:48+5:30
गो-रक्षणाच्या नावाखाली सुरु असलेल्या हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला निषेध फक्त शाब्दीक असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - गो-रक्षणाच्या नावाखाली सुरु असलेल्या हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला निषेध फक्त शाब्दीक असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी नोंदवलेला निषेध फक्त शब्दांचा खेळ आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही अशी टीका असदुद्दीन ओवेसी, ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने केली आहे. मोदींनी फक्त शब्दांचा खेळ केला. ते जे बोलले तसे त्यांनी करुन दाखवावे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये अंतर आहे अशी टीका ओवेसींनी टि्वटरवरुन केली आहे.
मोदी या मुद्यावर दोनदा बोलले पण त्याचा काही परिणाम दिसून आला नाही. मागच्यावर्षी दादरीमध्ये घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरुन मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केल्यानंतर मोदी या विषयावर बोलले होते. पण त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. गो-रक्षकांना भाजपा आणि संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो असे टि्वट ओवेसींनी केले आहे.
पहलू खानची हत्या करणा-या तिघांना अजून का अटक झालेली नाही ? याचे कारण राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे असे टि्वट ओवेसींनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टि्वट करुन गो-रक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्येचा निषेध केला आहे. हे सर्व थांबले पाहिजे. शब्द पुरेसे नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
PM statement is mere lip service as there has been slip b/w cup & lip so long an animal has a higher premium killings of human beings ctnu
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 29, 2017
सध्या देशात जे वातावरण आहे ते कोणी तयार केले ? हा प्रश्न पंतप्रधानांनी स्वत:ला विचारावा. फक्त निषेध नोंदवून भागणार नाही अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली. लोक पंतप्रधानांचे शब्द गांर्भीयाने घेतील अशी अपेक्षा करुया असे नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लाह यांनी म्हटले आहे.
Well said sir. Here"s hoping the people carrying out these despicable acts take your words to heart & act accordingly. https://t.co/BA6C8tORE1
— Omar Abdullah (@abdullah_omar) June 29, 2017
गुरुवारी अहमदाबादमध्ये बोलताना गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना दिला. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांचं हे वक्तव्य आलं आहे. उस्मान अन्सारी यांच्या घराजवळ गाय मृतावस्थेत आढळली असता सुमारे १०० जणांच्या जमावाने घरात घुसून अन्सारी यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या घराला आग लावली.