सोशल मीडियातून घाणेरड्या गोष्टी पसरवू नका, मोदींचे सव्वासौ करोड देशवासियांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:33 AM2018-08-30T06:33:08+5:302018-08-30T06:34:51+5:30
पंतप्रधान म्हणाले... खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक; हा मुद्दा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही
नवी दिल्ली : लोकांनी समाजमाध्यमांद्वारे घाणेरड्या गोष्टी पसरवू नयेत, ते सभ्य समाजाचे लक्षण नाही, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. वाराणसीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मोदी म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर आजूबाजूच्या अनेक चांगल्या गोष्टी इतरांना समजण्यासाठी केला जावा. खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक आहे.
संदेश किंवा व्हिडीओ यातील माहिती कितपत खरी आहे याची शहानिशा न करता ती इतरांना पाठविली जाते.
समाजमाध्यमांचा व्यवस्थित वापर करण्याचा मुद्दा हा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही. त्याचा संबंध देशातील १२५ कोटी जनतेशी आहे. समाज माध्यमांतील संदेशांमध्ये अनेकदा अभिरुचीहीन शब्दांचा वापर केलेला असतो. महिलांविषयी अत्यंत असभ्य भाषेत लिहिलेले असते. असे संदेश व्हायरल होऊ नयेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
गल्लीतले भांडणही बनते राष्ट्रीय बातमी
मोदी म्हणाले की, सध्या एखाद्या गल्लीत दोन कुटुंबांमध्ये झालेले भांडणही राष्ट्रीय स्तरावरची बातमी बनते. ती तशा पद्धतीने प्रसारित केली जाते. समाजमाध्यमांचा वापर दुसऱ्यांवर राळ उडविण्यासाठी करू नये, ही सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी.
देशाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, अशा पद्धतीच्या बातम्यांचा प्रसार वाढायला हवा. देशाचा चेहरामोहरा बदलत असून प्रगतीही झपाट्याने होत आहे. हे खरे चित्र दाखविणारे व्हिडीओ समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर पाठवा.