लोकांच्या पोटावर पाय आणू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:56 AM2022-01-14T07:56:01+5:302022-01-14T07:56:16+5:30
देशातील कोरोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी चर्चा केली.
नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकांच्या पोटावर पाय येणार नाही, याची दक्षता घ्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना सांगितले आहे. ओमायक्रॉन विषाणूमुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला असेल, तिथे स्थानिक स्तरावर कन्टेन्मेंट करण्यात यावा, अशीही सूचना त्यांनी केली.
देशातील कोरोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी चर्चा केली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते. राज्याच्या वतीने आरोग्य मंत्र्यांची उपस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या हालचालींवर सध्या मर्यादा आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सलग दोन- अडीच तास बसणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून राज्याच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित राहतील, असे कळविले होते. पंतप्रधान कार्यालयाने त्याला मान्यता दिल्यानंतर टोपे यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती, लसीकरण, उपाययोजना व निर्बंधांबाबत माहिती दिल्याचे टोपे म्हणाले.
ओमायक्रॉनबद्दल सावध राहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओमायक्रॉन विषाणूबद्दल असलेल्या शंकांचे हळूहळू निरसन होत आहे. कोरोना विषाणूच्या आधीच्या प्रकारांपेक्षा नवा विषाणू कित्येक पट वेगाने संसर्ग पसरवत आहे. मात्र, त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा स्थितीत नागरिकांनी अतिशय सतर्क राहिले पाहिजे. त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे.