प्यू रीसर्चचा अहवाल बघा नी एका मुलावर थांबू नका - VHP चं साकडं
By admin | Published: April 4, 2015 08:51 AM2015-04-04T08:51:41+5:302015-04-04T08:51:41+5:30
भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यायला हव्या या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. जर, हिंदूंनी एका मुलावर समाधान मानलं तर कालौघात मुस्लीम या देशाचा ताबा घेतील अशी भीतीही विहिंपने घातली आहे.
याखेरीज घर वापसी हा अत्यंत वादग्रस्त असलेला या हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रमही सुरूच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. माझ्या रक्ताचा डीएनए तपासला तर तो इथल्या हिंदूशी समानधर्म दाखवेल या ज्युलियो रिबेरो यांच्या वक्तव्याचा दाखला देत आम्हीपण हेच सांगतोय असं परिषदेनं म्हटलं आहे.
प्यू रीसर्चच्या अहवालाचा दाखला देताना विहिंपचे आंतरराष्ट्रीय सचिव चंपत राय म्हणाले की किती मुलं जन्माला घालायची हा वैयक्तिक प्रश्न नाही, तसे असते तर या देशाची फाळणी झाली नसती असंही त्यांनी सांगितले.
घरवापसीबाबत बोलताना चंपत राय म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारला आवडो वा ना आवडो हा कार्यक्रम सुरूच राहणार कारण यासाठीच विहिंपची स्थापना झालेली आहे. भारतातल्या प्रत्येकाचे पूर्वज कोण होते हे सांगणं आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार अशी पुस्तीही राय यांनी जोडली.
प्रवीण तोगडियांना पश्चिम बंगालमध्ये भाषण करण्यास मज्जाव घातल्याबद्दल त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे. अर्थात बंगालमधला हिंदू समाज जागा होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.