पाकिस्तानवर थेट कारवाई नाही?

By admin | Published: September 20, 2016 06:17 AM2016-09-20T06:17:50+5:302016-09-20T06:17:50+5:30

मोदी सरकारने पाकला प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजनैतिकदृष्ट्या वेगळे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

Do not take direct action in Pakistan? | पाकिस्तानवर थेट कारवाई नाही?

पाकिस्तानवर थेट कारवाई नाही?

Next

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सत्ताधारी भाजपामधील ‘साहसी’ मंडळींचा ताबडतोब ‘कारवाई’साठी दबाब वाढत असला तरी मोदी सरकारने पाकला प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजनैतिकदृष्ट्या वेगळे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. उरी येथील हल्ल्यामुळे देशभर तीव्र संताप व्यक्त होत आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्यात १८ जवान ठार तर २३ जखमी झाले.
उरी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अनेक बैठकांत आढावा घेतल्यानंतर मोदी सरकारमधील मंत्र्यांमागून मंत्र्यांनी पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी त्यांचे प्रायोजकत्व करतो, चिथावणी, मदत देतो व कटकारस्थाने करतो, असे थेट हल्ले केले. सुरवातीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोदी यांना माहिती दिली. नंतर गृहमंत्री राजनाथ सिंह, त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बैठकीत सहभागी झाले. तासाभरानंतर अर्थमंत्री अरूण जेटली सहभागी झाले व नंतर लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीला माहिती दिली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज मोदी यांच्याशी फोनवर बोलल्या.
व्यापक पहारा असतानाही भारतीय हद्दीत दहशतवादी घुसलेच कसे आणि दोन वर्षांपूर्वी ज्या छावणीवर हल्ला झाला होता तिच्यावरच पुन्हा कसा हल्ला झाला, या शब्दांत पंतप्रधानांनी मनोहर पर्रीकर यांच्याकडे संताप व्यक्त केला. दुसरे म्हणजे दहा दिवसांपूर्वी उरी छावणीवर हल्ला होईल असा इशारा गुप्तचरांनी दिला होता. सीमेवर आणि आतमध्ये सुरक्षा दलांकडून जो हलगर्जीपणा दाखवला गेला त्याबद्दलही मोदी संतप्त झाले. तथापि, भावनेच्या भरात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. सुषमा स्वराज सध्या अमेरिकेत असून त्या संयुक्त राष्ट्रांच्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत उरी हल्ल्याचा विषय उपस्थित करतील. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे संयुक्त राष्ट्रांत २१ जून रोजी बोलणार आहेत.
>‘मानवतेचा शत्रू’ म्हणून जाहीर करावे
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला ‘दहशतवादी देश’ म्हटले होते तर वरिष्ठ मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला ‘मानवतेचा शत्रू’ म्हणून जाहीर करावे, असे वाटते.
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सकाळी ‘पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले. हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याचे आम्हाला माहीत असून, त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
दहशतवादाला खतपाणी देत असल्याबद्दल जगात पाकिस्तानचे नाव घेऊन व त्याचा निषेध करायचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पाकच्या दहशतवादी कारवायांना उघडे पाडण्यासाठी मंत्र्यांच्या तुकड्या वेगवेगळ्या देशांत पाठविल्या जाऊ शकतील.
दहशतवादी हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याबद्दल कारवाई करता येईल असा पुरावा लष्करी कारवायांचे महासंचालक रणबीर सिंह यांच्याकडून त्याच्यासमोर ठेवला जाईल.
सरकारच्या सावध भूमिकेची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भावनेच्या पातळीवर आम्ही कारवाई करू शकत नाही.’’ सरकारकडून घाईघाईत कोणतीही हालचाल होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

Web Title: Do not take direct action in Pakistan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.