पराभवाचा राग संसदेत काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:35 AM2023-12-05T06:35:51+5:302023-12-05T06:36:31+5:30
सर्व सदस्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करून विधेयकांवर सखोल चर्चा करावी, चर्चा झाली नाही तर देश चांगल्या सूचनांना मुकतो.
नवी दिल्ली : चार राज्यांच्या निकालानंतर सोमवारी सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनावर त्याचे सावट दिसले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी सोमवारी विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा राग संसदेत काढू नका, नकारात्मकता मागे टाकून पुढे जा, तसे केल्यास त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलू शकेल, असे आवाहन केले.
हिवाळी अधिवेशनापूर्वी संसद भवनाबाहेर बोलताना ते म्हणाले, लोकांच्या आकांक्षा आणि विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी हे लोकशाहीचे मंदिर एक अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ आहे, सर्व सदस्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करून विधेयकांवर सखोल चर्चा करावी, चर्चा झाली नाही तर देश चांगल्या सूचनांना मुकतो.
बार बार मोदी सरकार...
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाने उत्साही झालेल्या पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदी सभागृहात दाखल झाल्यानंतर भाजपचे सदस्य आणि काही सरकारी मंत्री आपापल्या जागी उभे राहिले आणि ‘बार बार मोदी सरकार, तिसरी बार मोदी सरकार’ आणि ‘एक गॅरंटी, मोदी की गॅरंटी’ अशा घोषणा दिल्या.