रेमडेसिवीर वापरू नका, डब्ल्यूएचओची पुन्हा सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 06:09 AM2020-11-21T06:09:09+5:302020-11-21T06:09:58+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या पथकाने स्पष्ट केले आहे की, रेमडेसिवीर हे औषध घेतल्याने कोरोनाबाधित रुग्णावर काहीही विशेष परिणाम दिसून आलेले नाहीत तसेच यामुळे मृत्यू टाळता येतो असेही दिसून आलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रेमडेसिवीर या औषधाचा वापर कोरोना रुग्णांवर केला जाऊ नये, अशी स्पष्ट सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. रेमडेसिवीरसह पाच अन्य औषधांवर महिनाभर विविध चाचण्या केल्यानंतर हाती आलेल्या माहितीच्या आधारे जागतिक आरोग्य संघटना या निष्कर्षापर्यंत पोहचली आहे. भारतात रेमडेसिवीरचा वापर कोरोना संसर्गाची मध्यम तसेच गंभीर लक्षणे आढळत असलेल्या रुग्णांवर केला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या पथकाने स्पष्ट केले आहे की, रेमडेसिवीर हे औषध घेतल्याने कोरोनाबाधित रुग्णावर काहीही विशेष परिणाम दिसून आलेले नाहीत तसेच यामुळे मृत्यू टाळता येतो असेही दिसून आलेले नाही.
तज्ज्ञांनी दिलेला अहवाल गुरुवारी ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. कोरोना साथीच्या सुरुवातीपासून जगभराचे लक्ष या औषधाकडे वेधले गेले होते. अनेक डॉक्टरांनीही हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगले असल्याचा दावा केला होता. (वृत्तसंस्था)