आता नको पाकचा व्हिसा!
By Admin | Published: February 4, 2016 04:37 AM2016-02-04T04:37:14+5:302016-02-04T04:37:14+5:30
पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्याशी फोनवर बोलून, त्यांना पाकिस्तानचा व्हिसा देण्याचा प्रस्ताव दिला, परंतु आता आपण अन्य कार्यक्रमात व्यस्त
अनुपम खेर यांनी फेटाळला बासित यांचा प्रस्ताव
नवी दिल्ली : पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्याशी फोनवर बोलून, त्यांना पाकिस्तानचा व्हिसा देण्याचा प्रस्ताव दिला, परंतु आता आपण अन्य कार्यक्रमात व्यस्त असल्याने पाकिस्तानचा दौरा करू शकत नाही, असे सांगत खेर यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने भारतातील सहिष्णुतेचे ‘पोस्टर बॉय’ असा उल्लेख करीत अनुपम खेर यांच्यावर टीका केली आहे.
कराची साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आपल्याला व्हिसा नाकारण्यात आला असल्याचे खेर यांनी सांगितल्यानंतर, अब्दुल बासित यांनी मंगळवारी त्यांना फोन करून पाकिस्तानचा व्हिसा देण्याचा प्रस्ताव दिला, अशी माहिती पाक उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्याने दिली. ‘अनुपम खेर तुमचे नेहमीच स्वागत आहे. तुम्ही महान कलावंत आहात. आम्ही तुमचा आदर करतो,’ असे टिष्ट्वट बासित यांनी बुधवारी केले. त्यांना दिलेल्या उत्तरात खेर म्हणाले, ‘फोन केल्याबद्दल आणि कराची भेटीसाठी व्हिसाचा प्रस्ताव दिल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने त्या तारखा मी दुसऱ्या कार्यक्रमासाठी दिल्या आहेत.’
आपण काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समर्थन, यामुळेच आपल्याला व्हिसा नाकारण्यात आल्याचा आरोप खेर यांनी केला होता. पाकने व्हिसा नाकारण्याची ही तिसरी वेळ असल्याचा दावाही खेर यांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आता नको पाकचा व्हिसा!
————-
काँग्रेसची टीका
व्हिसा मुद्द्यावरून काँग्रेसने अनुपम खेर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतातील सहिष्णुतेचे ‘पोस्टर बॉय’ खरोखरच पाकला जाण्यास उत्सुक असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले ‘मित्र’ नवाज शरीफ यांच्याशी बोलून खेर यांच्या भेटीची सोय करू शकतात, असे टिष्ट्वट काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केले आहे.
काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनीही खेर यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आपण व्हिसासाठी पाकिस्तानी दूतावासाकडे अर्जच केलेला नाही, असे खुद्द खेर यांनीच कबूल केले आहे. व्हिसासाठी जर अर्जच केला नसेल, तर व्हिसा कसा मिळणार? अर्ज करणे बंधनकारक नाही काय?’
‘अनुपम खेर सॉरी सर. कथित एनओसीबाबत तुम्हाला कुणी सांगितले मला माहीत नाही, परंतु आम्हाला अद्याप तुमचा व्हिसाचा अर्ज आणि पासपोर्ट प्राप्त झालेला नाही,’ असे एक टिष्ट्वट बासित यांनी मंगळवारी केले होते.
—
व्हिसा का नाकारला हे पाकने सांगावे-भाजपा
पाकिस्तानी कलावंतांना व्हिसा देण्यात भारत फार उदार आहे, पण पाकिस्तान मात्र, बॉलीवूड कलावंतांबाबत भेदभाव करीत आहे. अनुपम खेर यांना नेमक्या कोणत्या आधारावर व्हिसा नाकारण्यात आला, हे पाकिस्तानने सांगितले पाहिजे, असे भाजपाचे सचिव श्रीकांत शर्मा यांनी म्हटले आहे.