तुमचे पैसे नको, आम्ही मत विकणार नाही; दलितांनी दिलं भाजपा समर्थकाला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:08 PM2019-05-22T14:08:57+5:302019-05-22T14:09:58+5:30
मतदानाच्या आदल्या दिवशी छोटेलाल तिवारी यांनी गावातील दलित कुटुंबीयांना धमकावले.
जीवनपूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. पण लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी पैसे देऊन मतं विकत घेण्याचे अनेक प्रकार समोर आले. अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाने धाड टाकत रोख रक्कम जप्त केली. मात्र उत्तर प्रदेशातील काही दलितांनी भाजपा समर्थकाला तुमचे पैसे परत घ्या, आम्ही मत विकत नाही असं बजावलं असल्याचा प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील चंदोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जीवनपूर गावातील ही घटना आहे. गावातील माजी प्रमुख आणि भाजपा समर्थक छोटेलाल तिवारी याने काही गुंडाच्या मदतीने दलित वस्तीतील 6 जणांना धमकी दिल्याचं उघड झालं. 500 रुपये घ्या आणि मतदान करु नका असं आमिष दिल्यानंतर 64 वर्षीय पनारू राम यांनी भाजपा समर्थकाला आम्ही मत विकत नाही, तुमचे पैसे परत घ्या असं बजावलं. यावरुन छोटेलाल तिवारी यांनी जबरदस्तीने पनारू राम यांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार केला.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 19 मे रोजी उत्तर प्रदेशातील चंदोली लोकसभेसाठी मतदान होणार होतं. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी छोटेलाल तिवारी यांनी गावातील दलित कुटुंबीयांना धमकावले. पनारु राम यांच्यासोबत 6 जणांनी भाजपा समर्थकाने दिलेली ऑफर फेटाळून लावली. हा सगळा प्रकार स्थानिक समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यासमोर उघड झाला. त्यानंतर या लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. रविवारी जेव्हा हे सगळे मतदानाला गेले तेव्हा त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर आधीच शाई लागली होती. पनारु राम सांगतात उजव्या हाताच्या बोटावरील शाई खोटी असून डाव्या हाताच्या बोटावरील शाई खरी आहे.
याबाबत पोलिसांनी 18 मे रोजी छोटेलाल तिवारी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. छोटेलाल तिवारीला अटक केली आहे मात्र त्याचे साथीदार फरार आहेत, फरार आरोपी कटवारू तिवारी आणि डिंपल यांचा शोध घेत आहोत अशी माहिती चंदोलीचे पोलीस अधिक्षक संतोष कुमार सिंह यांनी दिली. मात्र ही बाब समोर आल्यानंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी या घटनेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं सांगत हात वर केले.