डान्स बारमध्ये बारबालांवर पैसे उडवू नका- सर्वोच्च न्यायालय
By admin | Published: August 30, 2016 09:36 PM2016-08-30T21:36:58+5:302016-08-30T21:38:55+5:30
डान्स बारमध्ये बारबालांच्या अंगावर पैसे उडविणे हे चुकीचे असून, संस्कृतीविरोधात आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - डान्स बारमध्ये बारबालांच्या अंगावर पैसे उडविणे हे चुकीचे असून, संस्कृतीविरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना परवानगी देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेवर आज सुनावणी असून, पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.
बारबालांवर पैसे उडविण्याने त्यांना चांगले वाटते की वाईट हा विषय नाही, मात्र तशी परवानगी कोणालाही देता येणार नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. यासंदर्भात नव्या कायद्यानुसार राज्य सरकारला एक नोटीस जारी करण्यात आली असून, चार आठवड्यांमध्ये त्याचे उत्तर द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. नवीन कायद्यानुसार राज्य सरकारने बारबालांवर पैसे उडविण्यावर बंदी घातली आहे, याचे सर्वोच्च न्यायालयाने समर्थन केले.
अश्लील नृत्य करणाऱ्यास तीन वर्षांची कैद द्यावी, अशी तरतूद या कायद्यात केली आहे. मात्र, भारतीय दंड संहितेनुसार असे नृत्य केल्यास फक्त तीन महिन्यांची शिक्षा होण्यासाठी कायदा आहे. त्याप्रमाणेच डान्स बारचा परवाना असलेल्याला ऑर्केस्ट्राचा परवाना देता येणार नाही, अशी नव्या कायद्यात तरतूद आहे.