यूपीच्या भविष्याची नासाडी करू नका - मोदींची टीका
By admin | Published: February 28, 2017 04:24 AM2017-02-28T04:24:36+5:302017-02-28T04:24:36+5:30
उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले.
महू (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने काय वाट्टेल ते करावे, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले. ते निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. उत्तर प्रदेशात आपल्याला बहुमत मिळत नसेल, तर ते कोणालाच मिळू नये, असा प्रयत्न बसपा आणि सपा यांनी चालविला आहे, पण भाजपाला या राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल आणि आमचेच सरकार इथे स्थापन होईल, असा दावाही मोदी यांनी केला.
मोदी म्हणाले की, ‘भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका. समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे,’ असे सांगून मोदी म्हणाले की, ‘अनेक वर्षे राज्याची उपेक्षा करणाऱ्या काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मतदारांनी शिक्षा करावी.
आमचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर येईल, त्या वेळी आघाडीतील आमच्या मित्र पक्षांना भाजपाच्या सरकारमध्ये सहभागी करून घेतले जाईल,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासासाठी समिती स्थापन केली होती. तिचा अहवाल ५० वर्षे पडून होता. काँग्रेसच्या सरकारांनी या ५0 वर्षांत काहीच केले नाही. आता आम्ही त्याच्यावर काम सुरू केले आहे,’ असा दावा मोदी यांनी केला. ‘पूर्व उत्तर प्रदेशला पुरेसे पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल आणि या मागास राहिलेल्या भागाची आन, बान आणि शान पुन्हा मिळवून दिली जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
रविवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदी यांनी केलेल्या दिवाळी-रमझान भेदभाव वाक्याबद्दल जोरदार टीका केली होती.
>मुस्लिमांना उमेदवारी द्यायला हवी होती
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मुस्लिमांना उमेदवारी देणे आवश्यक होते, असे प्रतिपादन भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी येथे केले. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाने अनेक मुस्लीम उमेदवार दिले असून, तेथील मुस्लिमांचे प्रमाणही १९ टक्के आहे.
पाचव्या टप्प्यात ५७ टक्के मतदान
उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले. या टप्प्यात पाच वाजेपर्यंत सुमारे ५७.३६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदान संपण्याच्या वेळी अनेक केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा होत्या. ते पाहता, ६0 टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. मतदानाचे दोन टप्पे शिल्लक आहेत. आधीच्या चार टप्प्यांत ६१ ते ६५ टक्के मतदान झाले आहे.
>समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान