बलात्कारी, दहशतवादी विमानातून प्रवास करतात मग गायकवाडांवर बंदी का? - शिवसेना
By admin | Published: April 6, 2017 04:14 PM2017-04-06T16:14:56+5:302017-04-06T16:27:34+5:30
शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावरील बंदी हटवली नाही तर, एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची धमकी शिवसेनेने दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावरील बंदी हटवली नाही तर, एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची धमकी शिवसेनेने दिली आहे. 10 एप्रिलपर्यंत रविंद्र गायकवाड प्रकरणात काही तोडगा निघाला नाही तर, शिवसेना एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत सांगितले.
बलात्कारी, दहशतवादी, पाकिस्तानी कलाकार विमानातून प्रवास करु शकतात मग रविंद्र गायकवाडांवर का बंदी ? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. चप्पलेने मारहाण करण्यावर हत्येचा प्रयत्न असा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, एअर इंडियाच्या सीएमडीची औकात आहे का ? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
दरम्यान रविंद्र गायकवाडांवरील बंदीवरुन शिवसेनेने आज लोकसभेत जोरदार राडा केला. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपति राजू यांच्या अंगावर शिवसेना खासदार धावून गेले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वसहमतीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आगे. मुंबईतून एअर इंडियाचे विमान उडू देणार नाही अशी धमकी शिवसेनेने दिल्यानंतर एअर इंडियाने महाराष्ट्रातील विमानतळावर सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा
दरम्यान या संपूर्ण वादा प्रकरणी दोन आठवडयांनी आज रविंद्र गायकवाडांनी संसेदत निवेदन दिले. त्यांनी या संपूर्ण घटनेसाठी एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला जबाबदार धरले. मी एअर इंडियाच्या कर्मचा-यावर पहिला हात उचलला नाही. एअर इंडियाच्या कर्मचा-याने माझी कॉलर पकडून मला ढकलले त्यावेळी मी प्रतिकार केला असा आपला बचाव करताना गायकवाड म्हणाले.
तू खासदार असशील पण पंतप्रधान नाही असे मला त्या कर्मचा-याने ऐकवले. हवाई प्रवास माझा संविधानिक अधिकार आहे. हवाई कंपन्या माझा अधिकार कसा नाकारु शकतात ? असा सवाल गायकवाडांनी विचारला. माझा गुन्हा काय चौकशीशिवाय माझी मीडिया ट्रायल सुरु आहे असे गायकवाड म्हणाले.