Narendra Modi: सरकारी पैशांचा दुरुपयोग सत्ताधारी करतात का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले लक्ष ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 07:05 AM2023-04-22T07:05:11+5:302023-04-22T07:05:52+5:30
Narendra Modi: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नांबाबत निश्चित विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले.
नवी दिल्ली : सत्तेतील पक्ष सरकारी पैशांचा उपयोग देशाच्या विकासासाठी करताय की आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी किंवा मग व्होट बँक बनविण्यासाठी त्यांनी याची उधळपट्टी लावलीय? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नांबाबत निश्चित विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले.
नागरी सेवा दिनानिमित्त राजधानीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना मोदी बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्र उभारणीत आपली भूमिका वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. तुम्ही असे न केल्यास करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होऊन देशाची संपत्ती लुटली जाईल आणि तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी होईल, असे ते म्हणाले.
पैशांची उधळपट्टी होऊ नये, म्हणून सजग राहा
सरदार पटेल प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ म्हणत. तुम्हाला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील; अन्यथा देशाची संपत्ती लुटली जाईल. करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होईल आणि देशातील तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होईल. पंतप्रधानांनी सांगितले की, सध्याच्या काळात त्यांची (प्रशासकीय अधिकाऱ्यांची) भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. कारण, संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे.
काळजीपूर्वक निर्णय घ्या
n मोदींनी प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारही प्रदान केले. नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने जिल्ह्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हे पुरस्कार दिले जातात.
n मोदी म्हणाले की, लोकसेवकांचे छोटे-छोटे निर्णयही देशहित डोळ्यांसमोर ठेवून घेतले गेलेले हवेत. प्रत्येक पक्षाची स्वतःची एक विचारसरणी असते व घटनेने प्रत्येक पक्षाला हा अधिकार दिला आहे. मात्र, सरकारी कर्मचारी म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही गोष्टींकडे
बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.
n सत्तेवरील राजकीय पक्ष करदात्यांच्या पैशाचा वापर आपल्या पक्षाच्या फायद्यासाठी करतोय की देशहितासाठी? ते कुठे वापरले जात आहेत? तुम्ही यावर बारीक लक्ष ठेवावे.