आपण नक्की भारतातच राहतो का? सुप्रिया सुळेंनी विचारला गहन प्रश्न
By महेश गलांडे | Published: February 4, 2021 05:23 PM2021-02-04T17:23:13+5:302021-02-04T17:33:15+5:30
दिल्लीच्या गाझिपूर सीमारेषेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील सेलिब्रिटींनीही ट्विट करुन या आंदोलनसंदर्भात चर्चा केली आहे. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर जाऊ शेतकरी नेते राकेश टीकेत यांची भेट घेतली होती. आता, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गाझिपूर सीमेवर भेट दिली. मात्र, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे, आपण नक्की भारतातच राहतो का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
दिल्लीच्या गाझिपूर सीमारेषेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवरुन आणि मीडियाशी संवाद साधताना प्रश्न विचारला आहे.
गाझीपूर बॉर्डर, दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो.परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही.गाझीपूर बॉर्डरचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला. आपल्या संस्कृतीत 'अन्नदाता सुखी भव' असा उल्लेख आहे.पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे,हे निषेधार्ह आहे, असे ट्विट सुप्रिया सुळेंनी केले आहे.
आपण अन्नदाता सुखी भव: म्हणतो. पण आज अन्नदाता आंदोलन करतोय. गाझीपूर बॉर्डरवर अतिशय वाईट स्थितीत शेतकरी राहात आहेत. देशाच्या सीमेवर पण एवढी वाईट परिस्थिती नसेल. इथे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, इंटरनेट बंद केलं आहे, ही संतापजनक परिस्थिती असल्याचे खा. @supriya_sule म्हणाल्या.
— NCP (@NCPspeaks) February 4, 2021
आशिष शेलार यांची टीका
आंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय. 'बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मींग का करताय, याचं उत्तर अगोदर सुप्रिया सुळेंनी द्यावं. बारामती अॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग अगोदर बंद करावं, मग आंदोलक शेतकऱ्यांना गाझीपूरला भेटायला जावा, असा टोलाच शेलार यांनी खासदार सुळेंना लगावलाय. शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, शर्जील उस्मानी, शेतकऱ्यांच आंदोलन आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
संजय राऊत यांनीही घेतली होती भेट
2 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींचा समावेश होता. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर इथं पोहोचले आहे.