राज्यघटनेवर संघाचा विश्वास आहे काय?
By admin | Published: January 13, 2016 04:06 AM2016-01-13T04:06:00+5:302016-01-13T04:06:00+5:30
राज्यघटना व राष्ट्रध्वजावर रा. स्व. संघाचा विश्वास आहे काय, असा सवाल दारुल-उलूम- देवबंद या इस्लामिक संस्थेने केला आहे. गणराज्यदिनी मदरशांच्या परिसरात तिरंगा फडकविण्याचे
लखनौ : राज्यघटना व राष्ट्रध्वजावर रा. स्व. संघाचा विश्वास आहे काय, असा सवाल दारुल-उलूम- देवबंद या इस्लामिक संस्थेने केला आहे. गणराज्यदिनी मदरशांच्या परिसरात तिरंगा फडकविण्याचे आवाहन संघप्रणीत मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केल्यानंतर उफाळलेल्या वादात आता दारुल-उलूमने उडी घेतली आहे.
मदरशांच्या देशभक्तीबाबत आम्ही कधीही शंका उपस्थित केलेली नाही, असा खुलासा एमआरएमने केला असला तरी त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तिरंगा फडकविण्याचा निर्णय हा मदरशांचा वैयक्तिक पसंतीचा मुद्दा ठरतो. बहुतांश मदरसे स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिन साजरे करतात. ध्वजारोहणही केले जाते, असे दारुल-उलूमचे प्रसिद्धी सचिव अशरफ उस्मानी यांनी स्पष्ट केले. मदरशांनी स्वातंत्र्यलढ्यात भूमिका बजावली होती. याउलट देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात संघाचे योगदान काय, असा सवालही उस्मानी यांनी केला. संघ केवळ भगव्या झेंड्याची पूजा करतो. संघाने सर्वप्रथम आपले मुख्यालय व अन्य कार्यालयांवर तिरंगा फडकवावा. त्यानंतरच मदरशांबाबत बोलावे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
मुस्लिम राष्ट्रीय मंचचा खुलासा
१ मदरशांच्या देशभक्तीबाबत शंका उपस्थित करण्याचा या मोहिमेमागे उद्देश नाही. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही गणराज्यदिन आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करीत आहोत, असे स्पष्टीकरण मुस्लीम राष्ट्रीय मंचचे (एमआरएम) राष्ट्रीय निमंत्रक मोहंमद अफजल यांनी स्पष्ट केले.
२ मदरशांच्या देशभक्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही. सर्व नागरिकांनी महत्त्वाच्या राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी तिरंगा फडकवायला हवा. एमआरएमचे कार्यकर्ते मदरशांवर ध्वजारोहण करतील. एक मुस्लिम म्हणून आम्ही मदरशांबाबत बोलत आहोत.
३ मुस्लिम मातृभूमीवर प्रेम करतात, तिरंग्याला सलाम करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे आम्ही या मोहिमेला व्यापक स्वरूप देत आहोत.