नोटबंदीबद्दलच्या 'या' अफवांवर तुम्हीही ठेवलात का विश्वास ?

By Admin | Published: November 14, 2016 01:01 PM2016-11-14T13:01:42+5:302016-11-14T13:05:54+5:30

नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात संभ्रमाचे वातावरण असताना सोशल मीडियावरून अनेक अफवा व्हायरल झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

Do you believe that you have kept these 'rumors' about the note-taking? | नोटबंदीबद्दलच्या 'या' अफवांवर तुम्हीही ठेवलात का विश्वास ?

नोटबंदीबद्दलच्या 'या' अफवांवर तुम्हीही ठेवलात का विश्वास ?

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - काळ्या पैशाविरोधातील मोहीम तीव्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. लोकांनी जास्तीचे पैसे काढण्यासाठी तत्काळ एटीएम मशीनकडे धाव घेतली, मात्र चलन तुटवड्यामुळे पुरेसे पैसे उपलब्ध नसून अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून बँकांनीही शनिवार, रविवार जास्त काम करून लोकांना पैसे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकरणामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण दिसत असले तरीही देशाच्या भल्यासाठी थोडा त्रास सोसून, रांगेत उभं राहून पैसे काढण्यास बहुतांश नागरिकांची ना नाही. मात्र काही नतद्रष्ट लोकांना या योजनेतही गफला दिसत असून ती अयशस्वी छरावी यासाठी ते प्रयत्न करताना, विविध अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती परसवण्याचे प्रयत्न करत आहेत. 
कोणाताही आधार नसलेल्या, बिनबुडाच्या या अफवांमुळे नागरिक त्रस्त झाले असून तुम्हीही या अफवांवर विश्वास ठेवला नाही ना?
 
1)  माल वाहतूकदार जाणार संपावर, जीवनावश्यक गोष्टींचा करा साठा..
५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर व्हॉट्सअॅप, फेसबूक या सारख्या सोशल मीडियाद्वारे अनेक अफवा पसरल्या. त्यापैकीच एक म्हणजे सरकारच्या या निर्णयानंतर माल वाहतूकदार लवकरच संपावर जाणार असून दैनंदिन जीवनात लागणा-या जीवनावश्यक गोष्टींचा बाजारात पोचणार नसल्याने तुटवडा भासणार आहे. त्यामुळे त्यांचा साठा करून ठेवा, अशा आशयाचा मेसेज सर्वत्र फिरत होता. 
 
मात्र अशा कोणत्याही संपाची घोषणा झालेली नसून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेही या अफवा असल्याचे नमूद करत अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले.
 
 
2) २०००च्या नवीन नोटेत आहे चिप
सरकारने जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लवकरच नवीन नोटा बाजारात आल्या असून त्यामध्ये २०० रुपयांच्या नोटेचाही समावेश आहे. मात्र त्या नोटेबद्दलही बरीच चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, ती म्हणजे २००० रुपयांची नवी नोट अतिशय सुरक्षित असून त्यामध्ये नॅनो चिप बसवण्यात आली आहे. त्यामुळे ही नोट कुठे जाते याचा ट्रॅक ठेवता येणार आहे. मात्र ही एक सपशेल अफवा असून कोणत्याही नोटेमध्ये अशी चिप बसवण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
3) खरेदीसाठी रोख नसल्याने नागरिकांनी केली दिल्लीतील मॉलची लूट
५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर लोकांच्या हातात रोख पैसा नसल्याने दैनंदिन जीवनातील व्यवहारांत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बँका आणि एटीएम बाहेर लांबच लांब रांगा असल्याने त्यांना रोख रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. मात्र याच गोष्टीचा फायदा उचलून काही समाजकटंकानी अशी अफवा पसरवली की, खरेदीसाठी रोख रक्कम नसल्याने देशभरात अनागोंदी माजली आहे. राजधानी दिल्लीतील एका मॉलमध्ये लोकांनी लूटालूट केल्याची व्हिडीओ क्लीप सध्या बरीच व्हायरल झाली असून हातात रोख पैसे नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले. मात्र हे सत्य नसून त्या मॉलमध्ये  कार्ड-धारक ग्राहक खेरदीसाठी आले होते आणि त्यांनी कार्ड पेमेंट करून दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घेतल्या. तिथे कोणतीही लूटालूट झाली नाही. दिल्ली पोलिसांनीही ट्विटरवरून या अफवेचे खंडन केले. 
 
 
4) देशभरातील मीठाच्या किमती वाढल्या
चलनातील नोटा रद्द झाल्यानंतर विविध अफवांचे पीक पसरले, त्यातीलच एक  म्हणजे देशभरात मीठाचा तुडवडा असून त्याची किंमत ४०० रुपयांपर्यंत गेली आहे, ही अफवा वा-याच्या वेगाने देशभरात पसरली. शुक्रवारी रात्री आलेल्या या वृत्तानंतर काही नागरिकांनी तातडीने दुकाने गाठून मीठ खरेदी केले. या अफवेने राज्य शासन व पोलीस खडबडून जागे झाले आणि मीठ संपल्याचे वृत्त केवळ अफवा असून  कोणीही त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस व शासनाने केले. नागरिकांनी स्वत: जवळ खर्चासाठी ठेवलेले सुटै पैसे दुकानदारांना मिळावेत या हेतूने आणि नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला गालबोट लागावे या हेतून या अफवा पसरवल्या गेल्याचे बोलले जात आहे. 
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वत: ट्विटरवरून या वृत्ताचे खंडन करत मीठाचा तुडवडा नसल्याचे स्पष्ट केले. 
 
5) बँकेत जमा केल्या जाणा-या रकमेवर आकारला जाणार मोठा कर
५०० व १०००च्या  नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर त्या बँकांमधून बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबर २०१६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र बँकेत जमा करण्यात आलेल्या या रकमेवर मोठ्या प्रमाणात कर आकरण्यात येणार असल्याची अफवा पसरली. मात्र हे वृत्त खोटे असून हा कर सरसकट सर्वांना लागू होणार नाही तर २.५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल आणि त्यावरील रकमेसाठी उत्पन्नाचा स्रोत जाहीर करावा लागेल. मात्र ते उत्पन्न बेकायदेशीर असल्यास त्यावर २०० टक्के कर आकारण्यात येणार आहे. 
 
६) भाजपा नेते व कुटुंबियांकडे आधीच पोहोचल्या २००० च्या नोटा
पंतप्रधान मोदींनी नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल कमालीची गुप्तता बाळगली होती, ती एवढी की काही ठराविक लोक सोडल्यास शेवटपर्यंत मंत्र्यानाही या निर्णयाची कल्पना नव्हती. मात्र मोदी विरोधकांनी नोटबंदीच्या मुद्यावरून मोदींना टार्गेट करण्यासाठी भाजपा नेत्यांबद्दल अफवा पसरवण्यास सुरूवात केली. २०००च्या नोटा उपलब्ध झाल्यानंतरच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये एका मुलीच्या हातात २००० रुपयांच्या नोटेचे बंडल दिसत आहे. ती मुलगी ही भाजपाच्याच एका  मंत्र्याची मुलगी असून  भाजपा नेते व त्यांच्या कुटुंबियांकडे आधीच पैसे उपलब्ध झाल्याचा अपप्रचार विरोधकांनी सुरू केला. 
 
७) कॅश काढण्यासाठी बँक, ATM बाहेर गर्दी झाल्याने माजला हिंसाचार
५०० व १०००च्या  नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर बँका व एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली आणि त्यातूनच विविध ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या, हिंसाचार माजल्याच्या अफवा पसरू लागल्या. राजधानी दिल्लीतील बँका व एटीएमबाहेर हिंसाचार माजल्याची माहिती देणारे ४ हजाराहून अधिक फोन दिल्ली पोलिसांना आल्याचे ट्विट पीटीआयने केले होते. मात्र हे वृत्त खोटे ठरल्याचे थोड्याच वेळात स्पष्ट झाले. दिल्ली पोलिसांना अनेक कॉल आले हे खरे असले तरी ते इतर मुद्यांसबंदी होते, दिल्लीत हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही व त्या सर्व केवळ अफवाच होत्या. दिल्ली पोलिसांनी ट्विट करत कोठेही हिंसाचार वा चेंगराचेंगरी झाली नसल्याचे स्पष्ट केले. 
 
 
 
 
 
 
 
८) रोख रकमेअभावी झाला अनेकांचा मृत्यू
रोख रकमेअभावी देशात अंदाधुंदी माजल्याच्या अफवासोबतच अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या अफवाही अनेक समाजकंटकांनी पसरवल्या होत्या. नोटबंदीचा  निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या काळात काही मृत्यू झाले असले तरीही त्याचा व पैशांच्या कमतरतेचा एकमेकांशी काहीही संबंध नसून काहीजण मुद्दाम या बातमीचा नोटबंदीशी संबंध जोडत असल्याचे स्पष्ट झाले. मृतांच्या कुटुंबियांनीही या वृत्ताचे खंडन करत आपल्या नातलगाचा पैशांअभावी मृत्यू झालेला नसल्याचेही वेळीच स्पष्ट केले. 
 
 
९) नोटबंदीविरोधात हजारो नागरिकांची बँक, एटीएम बाहेर निदर्शने
नोटबंदीमुळे देशातील सर्वच नागरिकांना थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वांनाच बँका, एटीएम बाहेर अनेक तास रांगेत उभंही रहावं लागत आहे, मात्र देशाच्या भल्यासाठी थोडा त्रास सहन करण्यास सर्वसामान्यांची ना नाही. मात्र सरकारच्या निर्णयामुळे काळा पैसा धारकांचे धाबे दणाणले असून मोदीविरोधक, राजकीय नेते आणि समाजकंटकांनी मोदींच्या निर्णयाला गालबोट लावण्यासाठीच अनेक अफवा पसरवल्या. सामान्य नागरिकांमध्ये मोदींच्या निर्णयाविरोधात संतापाचे वातावरण असून हजारो नागरिक बँक व एटीएम बाहेर उबं राहून मोदींविरोधात निदर्शने करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यापैकी काही फोटो हे बरचे जुने होते, मात्र मोदींना नावं ठेवण्यासाठी तेच फोटो पुन्हा व्हायरल करत वातावरण पेटवण्यात आले. 
 

Web Title: Do you believe that you have kept these 'rumors' about the note-taking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.