बदल्यांसाठी पैसे द्यावे लागले का? शिक्षकांनी उत्तर देताच मुख्यमंत्री अशोक गहलोतांची बोलतीच बंद झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 08:31 PM2021-11-16T20:31:17+5:302021-11-16T20:31:44+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची मंगळवारी एका भाषणादरम्यान जी अवस्था झाली ते पाहून सगळेच हैराण झाले.
जयपूर - सरकारी कामासाठी लाच द्यावी लागते त्यासाठी कामं होतं नाहीत असं म्हणतात. याचा प्रत्यय शासकीय कर्मचाऱ्यांनाही येत असतो. आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली हवी असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. मंत्रालयात बदल्यांचे मोठे रॅकेट असते. मात्र एखाद्या मुख्यमंत्र्यांसमोरच कुणी याचा खुलासा केला तर मुख्यमंत्र्यांची अवस्था काय होईल? याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची मंगळवारी एका भाषणादरम्यान जी अवस्था झाली ते पाहून सगळेच हैराण झाले. अशोक गहलोत यांच्या भाषणाचा छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात मुख्यमंत्री शिक्षकांकडून वसुली होण्याच्या मुद्द्यावरुन समोर बसलेल्या गर्दीला विचारतात की हे खरं आहे का? त्यावर हॉलमध्ये बसलेले सर्वच हसायला लागतात आणि टाळ्यांच्या गजरात एकत्र हो म्हणून उत्तर देतात. बदली करुन घेण्यासाठी स्थानिक आमदारांच्या मागे लागावं लागतं. त्याचसोबत लाच द्यावी लागते असं शिक्षकांनी म्हटलं तेव्हा राज्याचे शिक्षणमंत्री गोविंद डोटासरा हेदेखील मंचावर उपस्थित होते.
शिक्षकांच्या या तक्रारीनंतर मुख्यमंत्री गहलोत यांची पंचाईत झाली. त्यांच्याकडे काहीच बोलायला नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना आश्वासन देत म्हटलं की, ही खूप गंभीर बाब आहे. शिक्षकांना बदलीसाठी पैसे मोजावे लागतात. यासाठी एक धोरण बनवण्याची गरज आहे. ज्यात शिक्षकांना २ वर्षांनी त्याची बदली कुठे आणि कधी होईल हे कळायला हवं. जेणेकरुन तेथील समस्येबाबत शिक्षकांना आधीच कल्पना असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
#WATCH कई बार तो हमने सुना है कि ट्रांसफर के लिए पैसे देने पड़ते हैं? दुख की बात है कि शिक्षक को पैसे देकर ट्रांसफर करवाना पड़ता है। मैं समझता हूं कि कोई ऐसी पॉलिसी बन जाए ताकि आपको पता हो कि आपका ट्रांसफर 2 साल में होगा: राजस्थान के जयपुर में शिक्षक समारोह में सीएम अशोक गहलोत pic.twitter.com/qHNLX2cfpJ
— ANI_HindiNews (@AHindinews) November 16, 2021
शिक्षकांनी परिस्थिती दाखवली - भाजपा
राजस्थान विधानसभेचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी या व्हिडीओ क्लीपवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. बदल्यांसाठी शिक्षकांना पैसे मोजावे लागतात. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासमोरच शिक्षकांनी एकाच स्वरात हा उत्तर दिलं. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. ते कधीही खोटं बोलत नाही. आज शिक्षकांनी सरकारचा भ्रष्ट चेहरा सगळ्यांना दाखवला. काँग्रेसच्या राज्यात कुठल्याही सरकारी खात्यात बदल्यांसाठी किंवा अन्य कामासाठी लाच दिल्याशिवाय कामं होत नाहीत. एका इंटरनॅशनल रिपोर्टनुसार राजस्थानच्या ६४ टक्के जनतेने मान्य केलंय की, विना लाच सरकारमध्ये काम होऊ शकत नाही असा टोला भाजपाने लगावला आहे.