सिक्किमच्या पाक्योंग विमानतळाबद्दल तुम्हाला ही माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:31 AM2018-08-21T10:31:18+5:302018-08-21T10:35:29+5:30
विमानतळ नसणारे सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य होते, पाक्योंग हे देशातील १०० वे कार्यरत असणारे विमानतळ असेल.
गंगटोक- सिक्किम हे भारतातील एक चिमुकले राज्य आहे. पण भौगोलिक व लष्करीदृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. एका बाजूला नेपाळ, दुसर्या बाजूला भूटान आणि तिसऱ्या बाजूला चीनचा तिबेट हा स्वायत्त प्रांत अशा महत्त्वपूर्ण जागी सिक्किम आहे. या महत्त्वाच्या राज्यात आता रेल्वे आणि विमानसेवा तयार होत आहे. सिक्किमचा पाक्योंग विमानतळ लोकांच्या मदतीसाठी तयार असून आता सिक्किमचे लोक त्याचा उपयोग करु शकणार आहेत. यापूर्वी सिक्किमला शेजारच्या राज्यातील बागडोगरा विमानतळाचा आधार होता, आता सिक्किमला स्वतःचे विमानतळ मिळाले आहे.
पाक्योंग विमानतळापाठोपाठ या राज्यात रेल्वेचाही प्रवेश होणार आहे. सिक्किमने रासायनिक खते, रसायने यांच्यावर बंदी घालून देशातील पहिले व एकमेव सेंद्रीय राज्य होण्याचा सन्मान याआधीच मिळवला आहे. येत्या काळात सिक्किम १०० टक्के साक्षर होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पवनकुमार चानलिंग यांनी नुकतेच जाहीर केले होते.
The Pakyong (Gangtok) Airport at Sikkim got license today for scheduled operations. It’s an engineering marvel at a height of more than 4,500 ft in a tough terrain. Will pave way for direct air connectivity to our lovely state of Sikkim, giving boost to tourism & economic growth pic.twitter.com/qJT0YcGw5x
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) May 4, 2018
१) पाक्योंग विमानतळ भारत आणि चीन यांच्यामधील सीमेपासून केवळ ६० किमी अंतरावर आहे. या विमानतळाचा पर्यटकांसह भारतीय लष्करालाही वापर करता येईल. बागडोगरा विमानतळावर उतरुन सिक्किममध्ये जाण्यास पूर्वी पाच तासांचा प्रवास करावा लागे, आता हा प्रवासवेळ वाचणार आहे.
२) पाक्योंग विमानतळ हा भारतीय अभियत्यांनी घडवलेला चमत्कारच म्हणायला हवा. अत्यंत प्रतिकूल भौगोलिक प्रदेशात हा विमानतळ बांधला असून तो समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंचीवर आहे.
३) विमानतळ नसणारे सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य होते, पाक्योंग हे देशातील १०० वे कार्यरत असणारे विमानतळ असेल.
४) पाक्योंग विमानतळावर स्पाइसजेट कंपनीने आधीपासूनच चाचणी उड्डाणे सुरु केली असून इतर कंपन्याही सिक्किमकडे वळण्याची शक्यता आहे.
५) या विमानतळाच्या निर्मितीसाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.