तुम्ही मूनलायटिंग करता? कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या शब्दाची प्रचंड चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:19 AM2022-09-18T10:19:16+5:302022-09-18T10:19:49+5:30
तुम्ही तुमची मुख्य नोकरी सांभाळून अन्य माध्यमांतून पैसा कमावता का, असा आहे.
शीर्षक वाचून मूनलायटिंग करता का, म्हणजे काय? किंवा आता हा काय नवीन प्रकार आहे, असा प्रश्न पडेल. पण सध्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या शब्दाची प्रचंड चर्चा आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे, तुम्ही तुमची मुख्य नोकरी सांभाळून अन्य माध्यमांतून पैसा कमावता का, असा आहे.
मनोज गडनीस
मूनलायटिंग म्हणजे नेमके काय?
या शब्दाचे उमगस्थान अमेरिकेत आहे. अमेरिकेतील नोकरदार वर्गाने मंदीच्या अनुभवानंतर रोजच्या ९ ते ५ या कामाच्या वेळेनंतर चंद्रोदयाच्या वेळी अर्थात संध्याकाळी दुसरे काम करत पैसे कमाविण्यास सुरुवात केली. तसेच शनिवार-रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी काम करून अतिरिक्त पैसे मिळविण्यास सुरुवात केली. रोजच्या कामानंतर म्हणजे संध्याकाळी करण्यात येणाऱ्या कामामुळे या संकल्पनेला मूनलायटिंग असे संबोधण्यात येते.
कशी झाली सुरुवात?
याची सुरुवात जरी अमेरिकेत झाली असली तरी भारतामध्ये स्वीगी कंपनीने सर्वप्रथम कंपनीचे मूनलायटिंग धोरण जाहीर केले. या धोरणानुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काही शर्ती व अटींच्या अधीन राहून दुसरे काम करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, या संकल्पनेने खरा वेग घेतला तो आयटी उद्योगात. लॉकडाऊनपासून आजपर्यंत अनेक आयटी कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. रोजचे काम संपल्यानंतर आपल्या गुणवत्तेचा, कौशल्याचा वापर करून ते अन्य काम करत पैसे मिळवत आहेत.
कंपन्यांचे म्हणणे काय?
मूनलायटिंगवरून आयटी कंपन्यांमध्ये २ गट पडले आहेत.
पहिल्या गटाचे म्हणणे असे की, एखादी व्यक्ती जर एका ठिकाणी काम करत पैसे मिळवत असेल तर त्याचवेळी दुसरीकडून पैसे मिळवणे हे अनैतिक आहे. तसेच, एखाद्या कर्मचाऱ्याने असे केल्यास त्याचे मुख्य कामातील लक्ष विचलित होऊ शकते.
दुसऱ्या गटाचे म्हणणे असे आहे की, कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीच्या कंत्राटाप्रमाणे ठराविक तास कंपनीसाठी काम करणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्याने काय करायचे, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसेच, समजा कर्मचाऱ्याने मुख्य कंपनीच्या कामात अडथळा, बाधा येणार नाही, अशारितीने केले तर त्याला कंपनीची हरकत नसावी. यातून त्या कर्मचाऱ्याकडे अन्य प्रकारचे कौशल्य विकसित होईल.
हे कायदेशीर आहे का?
देशातील फॅक्टरी ॲक्ट १९४८ च्या कलम ६० नुसार दोन ठिकाणी नोकरी करणे बेकायदेशीर आहे. मात्र, या कारखान्याशी संबंधित ही व्याख्या असल्याने आयटी अथवा सेवा क्षेत्राला या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत.
मात्र, प्रत्येक राज्यामध्ये ‘द शॉप अँड एस्टॅब्लिशिमेंट ॲक्ट’ आहे. या कायद्यानुसारदेखील दोन ठिकाणी नोकरी करणे अवैध आहे.
एखादी कंपनी मूनलायटिंग संदर्भात जो धोरणात्मक निर्णय घेईल तो त्या कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असेल.
एकावेळी दोन ठिकाणी नोकरी करून पैसे कमाविणे ही मूनलायटिंगची व्याख्या ग्राह्य धरली जाते. मात्र, या निमित्ताने सुरू झालेल्या वादामध्ये आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे.
ती अशी की, जर एका ठिकाणी नोकरी करत असलेल्या व्यक्तीने ते काम संपल्यानंतर, आपल्या छंदाच्या माध्यमातून जर पैसे कमावले तर त्याची गणना मूनलायटिंगमध्ये करणार का?, आजच्या घडीला अनेक लोक शेअर बाजाराच्या गुंतवणुकीतून पैसा कमावतात किंवा सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्स म्हणून काम करतात. त्याद्वारेदेखील त्यांना पैसे मिळतात.
कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया कसा वापरावा, या संदर्भात अनेक कंपन्यांची काही खास पॉलिसी नाही. अशा स्थितीत या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांची गणना पण मूनलायटिंगमध्ये केली जाणार का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.