पत्नी आणि प्रेयसीने मिळून केली लफडेबाज डॉक्टरची धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 12:42 PM2018-06-21T12:42:07+5:302018-06-21T12:42:07+5:30
पत्नीला फसवून सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणशीसोबत दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉक्टरला रंगेलपणा चांगलाच महागात पडला आहे.
गाझियाबाद - पत्नीला फसवून सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणशीसोबत दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉक्टरला रंगेलपणा चांगलाच महागात पडला आहे. नवऱ्याच्या या इष्कबाजीची खबर लागलेल्या पत्नीने सर्व हकीकत त्या तरुणीस सांगितली. मग या तरुणीने नातेवाईकांसोबत मिळून लफडेबाज डॉक्टरची धुलाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार हा डॉक्टर मुंबईतील आहे. दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह मुंबईतच राहणाऱ्या आणि पेशाने सहाय्यक प्राध्यापक असलेल्या तरुणीसोबत झाला. विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे या तरुणीने नोकरी सोडली. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र सहा महिन्यांपूर्वी पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर ही तरुणी माहेरी राहण्यास गेली. तर हा डॉक्टर तरुण गाझियाबादमधील एका खासगी रुग्णालयात नोकरीवर रुजू झाला.
यादरम्यान एकटा राहत असलेल्या डॉक्टराची दिल्लीत राहणाऱ्या तरुणीशी सोशल मीडियावरून मैत्री झाली. काही दिवसांतच त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पण आपण आधीच विवाहित असल्याचे त्याने या तरुणीस सांगितले नाही. तसेच आपल्या कुटुंबीयांकडूनही विवाह निश्चित करून घेतला. दोन्ही कुटुंबांमध्ये ठरल्यानुसार ऑगस्टमध्ये साखरपुडा आणि ऑक्टोबर महिन्यात विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.
मात्र आपल्या पतीच्या या कारनाम्यांची माहिती पत्नीला लागली. तिने संबंधित तरुणीची भेट घेऊन तिला सत्य परिस्थिती कथन केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने आपल्या नातेवाईकांसह त्या डॉक्टरचे घर गाठले आणि त्याची बेदम धुलाई केली.