बालविवाह झालेली "रूपा" होणार डॉक्टर
By admin | Published: July 1, 2017 03:30 PM2017-07-01T15:30:08+5:302017-07-01T15:30:08+5:30
वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालेली रूपा यादव ही वीस वर्षीय तरूणी लवकरच राजस्थानमध्ये डॉक्टर होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 1- वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालेली रूपा यादव ही वीस वर्षीय तरूणी लवकरच राजस्थानमध्ये डॉक्टर होणार आहे. सासरच्या मंडळींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आता वैद्यकीय शिक्षणाची ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा रूपाने पास केली असून ती डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहाते आहे. लग्नानंतरही रूपाने शिक्षण घेणं सुरू ठेवलं आहे. कोटामधील एका शिक्षण संस्थेतून तिने नीटसाठी अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात रूपाला नीटची परीक्षा पास करण्यात यश आलं आहे. तिने वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत 603 गुण मिळविले आहेत. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
पाच भावंडांमध्ये रूपा सर्वात लहान आहेत. रुपाचं तिच्या मोठ्या बहीणीच्या लग्नातच लग्न लावून देण्यात आलं होतं. तिसरीत शिकत असताना तिचं लग्न झालं. तिच्या लग्नाच्या वेळी तिचा पती शंकरलाल १२ वर्षांचा होता. लग्नानंतर रूपाला तिच्या दिराने पाठिंबा दिल्याने तिने शिक्षण सुरु ठेवलं.
"दहावीत मला ८४ टक्के गुण मिळाल्यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिने शिक्षण सुरुच ठेवावं, असा आग्रह धरला होता. त्याला सासरच्यांनीही त्याला मान्यता दिल्याने मी पुढचं शिक्षण घेतलं, असं रूपा यादवने द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला सांगितलं आहे.
गावापासून ६ किलोमीटर लांब असणाऱ्या कॉलेजमध्ये रूपाने दहावीनंतरच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता. अभ्यास आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत तिने अकरावी आणि बारावीची परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवलं. रूपाला अकरावीत 81 टक्के तर बारावीच्या परीक्षेत 84 टक्के मिळाले. रूपाचे काका भीमराव यादव यांचं अचानक ह्रदय रोगाचा झटका आला होता आणि त्यावेळी त्यांना योग्य मेडिकल सुविधा न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच रूपाने डॉक्टर व्हायचा निर्धार केला होता. या निर्धारानुसारच तिने डॉक्टर होण्यासाठी मेहनत सुरू केली. रूपाला कोटामध्ये परीक्षेची तयारी करायची होती पण घरच्या आर्थिक अडचणींमुळे तिला बाहेर शिक्षण घेणं शक्य नव्हतं. यावेळी रूपामध्ये असणाऱ्या शिकण्याच्या जिद्दीने अलेन कोचिंग इन्स्टीट्यूटने एका फीच्या रकमेच्या काही टक्के शिष्यवृत्ती दिली, तसंच कॉलेजच्या वसतिगृहात तिची राहण्याचीही व्यवस्था केली.
"माझ्या सासरच्या लोकांनी मला नेहमीची ते माझे आई-वडील असल्यासारखी वागणूक दिली आणि शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन दिलं. पण आमच्या कुटुंबाचा शेती व्यवसाय असल्याने त्यातून फारसं उत्पन्न येत नव्हतं. त्यामुळे माझ्या पतीने माझ्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी टॅक्सी चालवायला सुरूवात केली, असं रूपाने सांगितलं आहे.
अलेन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सध्या रुपा एमबीबीएसचे शिक्षण घेते आहे.