"डॉक्टर सर्जरी करायला उशीर करताहेत"; रुग्णाने केला थेट पोलिसांनाच फोन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 01:33 PM2024-02-14T13:33:52+5:302024-02-14T13:41:32+5:30
एका रुग्णाने सर्जरीला उशीर झाल्याचा आरोप करत 112 क्रमांकावर पोलिसांना फोन केला.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका रुग्णाने सर्जरीला उशीर झाल्याचा आरोप करत 112 क्रमांकावर पोलिसांना फोन केला. आपली सर्जरी सतत पुढे ढकलली जात असल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. रुग्णाच्या हृदयाच्या तीन नसा ब्लॉक झाल्या असून त्याच्यावर बायपास सर्जरी करण्यास सांगण्यात आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ही सर्जरी इथे शक्य होणार नाही पण रुग्ण ते ऐकायलाच तयार नाही.
हे संपूर्ण प्रकरण मेरठच्या लाला लजपत राय मेडिकल कॉलेजच्या कार्डिओ सर्जरी विभागातील आहे, जिथे राजा (48) नावाचा रुग्ण दाखल आहे. रुग्णाची सर्जरी होणार होती मात्र ती सातत्याने पुढे ढकलली जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याची समजूत काढली आणि त्याला वॉर्डमध्ये परत पाठवलं.
रुग्णावर उपचार करत असलेले डॉक्टर शशांक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या तीन नसा ब्लॉक झाल्या आहेत आणि एका ठिकाणी 99% ब्लॉकेज आहे. रुग्णाला बायपास सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला असून मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये बायपास सर्जरीची सुविधा उपलब्ध नाही. अशा स्थितीत त्याला रेफर केले जात आहे. पण रुग्ण ऐकायला तयार नाही. उपचार करण्यासाठी तो डॉक्टरांवर सतत दबाव टाकत आहे.
डॉ. धीरजकुमार सोनी म्हणाले की, राजा नावाचा एक रुग्ण असून तो तारापुरीचा रहिवासी आहे. त्याच्या अँजिओग्राफीमध्ये तिन्ही नसा ब्लॉक असल्याचं आढळून आलं. रुग्णाला सतत आपल्या उपचाराची चिंता असून उपचार होत नसल्याचा आरोप केला जात आहे. रुग्ण आयुष्मान योजनेचा लाभार्थी आहे. त्याच्यावर संपूर्ण उपचार सुरू आहेत.