कोणीच सुटलेलं नाही...! जिममध्ये वर्कआऊट करताना डॉक्टरला आला हार्ट अटॅक; काळजी घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:16 PM2023-01-07T15:16:43+5:302023-01-07T15:27:39+5:30
संजीव पाल यांची तब्येत बिघडली आणि वर्कआउट करताना ते खाली पडले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना एका डॉक्टरची तब्येत अचानक बिघडली. जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विकास नगर भागात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय डॉक्टर संजीव पाल जिममध्ये वर्कआउट करत होते.
संजीव पाल यांची तब्येत बिघडली आणि वर्कआउट करताना ते खाली पडले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव पाल बाराबंकीच्या रुग्णालयात काम करत होते. ते पत्नी आणि दोन मुलींसह विकासनगर येथे राहत होते. नेहमी प्रमाणे ते टेढी पोलीस ठाण्यातील जीममध्ये वर्कआउट करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
डॉक्टर बेशुद्ध झाले असे जिमच्या लोकांना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी संजीव यांना मृत घोषित केले. विकास नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आहे. मात्र पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर खरे कारण समजेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या काही दिवसांत जीममध्ये व्यायाम करताना लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. यामध्ये जीम ट्रेनर, व्यावसायिक, अभिनेता यांनी जीव गमावला आहे. यापूर्वी इंदूरमधूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. येथील जिममध्ये व्यायाम करत असताना हॉटेल चालकाला चक्कर आल्यासारखं वाटलं आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"