डॉक्टरांनी सफाई कामगाराला करायला लावली प्रसूती, चुकीची नस कापल्याने नवजात बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 06:05 AM2023-12-02T06:05:53+5:302023-12-02T06:06:15+5:30
Bihar News: पाटण्यातील दानापूर येथील एका नर्सिंग होममध्ये सफाई कामगाराकडून महिलेची प्रसूती डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे करून घेतली. एवढेच नाही, तर प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापण्यास सांगितले. मात्र, चुकून दुसरी कापल्याने बालकाचा मृत्यू झाला.
पाटणा - बिहारची राजधानी पाटणा येथे एका नर्सिंग होममध्ये निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा जन्मानंतर मृत्यू झाला.
पाटण्यातील दानापूर येथील एका नर्सिंग होममध्ये सफाई कामगाराकडून महिलेची प्रसूती डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे करून घेतली. एवढेच नाही, तर प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापण्यास सांगितले. मात्र, चुकून दुसरी कापल्याने बालकाचा मृत्यू झाला. बालकाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी गोंधळ घालत रुग्णालयाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सफाई कामगारासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अटक केली. डॉक्टर मात्र अद्याप फरार आहे.
तरकारीया बाजार येथील रविशंकर यांची गर्भवती पत्नी ज्युली कुमारी हिला प्रसूती वेदना होत असल्याने तिला हर्षित पाली नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. दाखल करून घेतल्यानंतर डॉ. कांचन लता ज्युलीला सफाई कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सोडून कुठेतरी गेल्या. यादरम्यान महिलेला तीव्र प्रसूती वेदना झाल्या आणि तिची नॉर्मल प्रसूती झाली.
याची माहिती मिळताच डॉक्टरांनी सफाई कामगार सुनीता आणि कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉलद्वारे मूल कसे जन्माला येते हे सांगितले. परंतु, अनुभव नसल्याने त्यांनी नवजात बालकाची चुकीची नस कापली.