भररस्त्यामधून डॉक्टरचं अपहरण, मागितली ६ कोटींची खंडणी, मग ३०० रुपये देऊन धाडले माघारी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:19 IST2025-01-28T11:19:25+5:302025-01-28T11:19:47+5:30
Karnataka Crime News: कर्नाटकमधील बेल्लारी येथून शनिवारी अपहरणाची एक अजब घटना समोर आली आहे. येथे कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी एका डॉक्टरचं भररस्त्यामधून अपहरण केलं. त्यानंतर त्याच्या भावाकडे ६ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

भररस्त्यामधून डॉक्टरचं अपहरण, मागितली ६ कोटींची खंडणी, मग ३०० रुपये देऊन धाडले माघारी, कारण काय?
कर्नाटकमधील बेल्लारी येथून शनिवारी अपहरणाची एक अजब घटना समोर आली आहे. येथे कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी एका डॉक्टरचं भररस्त्यामधून अपहरण केलं. त्यानंतर त्याच्या भावाकडे ६ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. सुमारे १४ तासांनंतर, अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला बसच्या तिकिटासाठी ३०० रुपये देऊन एका निर्मनुष्य वाटेत सोडले. आता या घटनेची एकच चर्चा सुरू आहे.
ही घटना बेल्लारी जिल्ह्यात घडली. इथे ४५ वर्षीय डॉक्टर सुनील यांचं शनिवारी सकाळी सूर्यनारायण पेठ शनैश्वर मंदिराजवळ फिरत असताना अपहरण करण्यात आलं होतं. टाटा इंडिगो कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि घेऊन घेले. अपहरणाची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
डॉक्टर सुनील हे बेल्लारी जिल्हा रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करतात. अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांचे भाऊ वेणुगोपाल गुप्ता यांना व्हॉट्सअॅप कॉल केला आणि डॉक्टरांना सोडण्याच्या मोबदल्यात ६ कोटी रुपये देण्याची मागणी केली. सहा कोटी रुपयांपैकी अर्धी रक्कम रोखीमध्ये आणि अर्धी रक्कम सोन्याच्या रूपात देण्यात यावी, अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली.
दरम्यान, वेणुगोपाल गुप्ता यांनी त्वरित पोलिसांना फोन करत भावाच्या अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरणाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत डॉक्टरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यामध्ये नाकेबंदी करण्यात आली. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी त्यांचं मन बदललं आणि अपहरण केलेल्या डॉक्टरांना एका निर्मनुष्य ठिकाणी सोडून दिलं. एवढंच नाही तर त्यांना घरी जाण्यासाठी बसच्या तिकिटाचा खर्च म्हणून ३०० रुपये सुद्धा दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरणाच्या घटनेमुळे डॉ. सुनील यांना जबर धक्का बसला आहे. तर अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. या अपहरणामागे डॉक्टरांचा भाऊ वेणुगोपाल यांचा मद्याचा व्यवसाय हे कारण असू शकतं.