पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरनं दान केली ५ कोटींची संपत्ती; डोळ्यात पाणी आणणारी हृदयस्पर्शी कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 05:02 PM2022-01-15T17:02:25+5:302022-01-15T17:03:45+5:30
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरनं आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे.
हमीरपूर-
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरनं आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या डॉक्टरांना कुणीही वारसदार नाही. त्यामुळे त्यांनी ५ कोटींहून अधिक किमतीची संपत्ती दान केली आहे. डॉक्टरांनी तयार केलेलं इच्छापत्र परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
नादौनच्या जोलसप्पड गावात सनकर येथील रहिवासी असलेले ७२ वर्षीय डॉक्टर राजेंद्र कंवर हे स्वास्थ्य विभाग आणि त्यांची पत्नी कृष्णा कंवर या शिक्षा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या वर्षी कृष्णा कंवर यांचं निधन झालं. दोघांना कुणीही वारस नसल्यानं आपली संपूर्ण संपत्ती आपल्या पश्चात सरकारला दान करायची असं दोघांनीही ठरवलं होतं. पत्नीच्या निधनानंतर आता तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र कंवर यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत बैठक घेऊन आपली संपूर्ण संपत्ती सरकारला दान करत असल्याचं जाहीर केलं.
पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं दान
आपली संपूर्ण संपत्ती दान करताना डॉ. राजेंद्र कंवर यांनी केलेलं विधान देखील त्यांच्याप्रतीचा सन्मान वाढेल असं आहे. "ज्या लोकांना घरात राहण्यासाठी जागा दिली जात नाही आणि वृद्धापकाळात ज्यांना उन्हातान्हात भटकावं लागतं अशांसाठी सरकारनं माझ्या संपत्तीतून मदतकार्य करावं. यासाठीची अट देखील इच्छापत्रात नमूद करण्यात आली आहे", असं राजेंद्र कंवर म्हणाले.
बेघर वृद्धांच्या निवाऱ्याची सरकारनं सोय करावी
वयोवृद्ध व्यक्तींसोबत सर्वांनी नेहमीच आदर आणि प्रेम भावना ठेवावी, असं आवाहन डॉ. राजेंद्र कंवर यांनी सर्वांना केलं आहे. त्यांनी स्वत:च्या घरासोबतच राष्ट्रीय महामार्गानजिकची पाच एकर जमीन आणि गाडी देखील सरकारला दान केली आहे. त्यांनी २३ जुलै २०२१ रोजीच संपूर्ण संपत्ती सरकारच्या नावे केली असून आता एकट्यानं उर्वरित आयुष्य जगणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
घरीच करायचे अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार
१९७४ साली एमबीबीएसपर्यंतचं शिक्षण डॉ. राजेंद्र कंवर यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर प्रॅक्टीस पूर्ण केल्यानं ३ जानेवारी १९७७ साली त्यांनी भोरंज येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात चिकित्सक म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरीच्या कार्यकाळात रुग्णांप्रती सेवाभावानं काम केल्यानं त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आणि त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. डॉ. कंवर सध्या जोलसप्पड येथे आपल्या राहत्या घरीच दररोज शेकडो गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात.