चिमुकल्याच्या अन्न नलिकेत अडकले नाणे; अवघ्या 90 सेकंदाच्या सर्जरीने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 07:02 PM2023-10-18T19:02:09+5:302023-10-18T19:02:40+5:30
दीड वर्षीय बालकावर वेळीच सर्जरी झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
नवी दिल्ली: नवी दिल्लीतील एका रुग्णालयातून अनोखी घटना समोर आली आहे. दीड वर्षाच्या बालकाने एक रुपयाचे नाणे गिळले, हे नाणे त्याच्या अन्न नलिकेत अडकले. यानंतर त्या बालकाला तात्काळ फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉ. शुभम वात्स्या यांनी त्याच्यावर छोटीशी सर्जरी करुन त्या बालकाचा जीव वाचवला.
डॉ. शुभम यांनी सांगितले की, ही अतिशय आव्हानात्मक केस होती. काळजीपूर्वक मुलाच्या अन्न नलिकेतून नाणे काढण्यात आले. थोडाही उशीर झाला असता, तर कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. एंडोस्कोपीच्या मदतीने ही सर्जरी करण्यात आली. ही संपूर्ण शस्त्रक्रिया अवघ्या 90 सेकंदात पूर्ण झाल्याचे बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ.आनंद सिन्हा यांनी सांगितले.
ही सर्जरी वेळेत झाली नसती, तर फुफ्फुसाचा संसर्ग होण्याचा धोका होता. पण, डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक ही सर्जरी पार पाडली. सध्या त्या बालकाची तब्येत ठीक असून, तो डॉक्टरांच्या निगराणीत आहे.