आठव्या वर्षी विवाह झालेली रूपा होणार डॉक्टर
By admin | Published: July 2, 2017 12:36 AM2017-07-02T00:36:29+5:302017-07-02T00:36:29+5:30
रूपाचा विवाह झाला, तेव्हा ती होती अवघ्या आठ वर्षांची. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह समारंभ सुरू असताना, त्याच मंडपात तिचेही
जयपूर : रूपाचा विवाह झाला, तेव्हा ती होती अवघ्या आठ वर्षांची. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह समारंभ सुरू असताना, त्याच मंडपात तिचेही लग्न लावण्यात आले. तेव्हा तिचा नवरा शंकरलाल हाही अवघा १३ वर्षांचा होता. कशामुळे कोणास ठाऊ क, बालविवाह असूनही तेव्हा तिच्या वा त्याच्या पालकांवर कारवाई झाली नाही.
रूपा आता २0 वर्षांची झाली आहे. लग्नानंतर चूल आणि मूल न करता ती शिकत राहिली. तिच्या दिराने तिला शिक्षणाची प्रेरणा दिली. तिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीटची परीक्षा दिली आणि त्यात ती उत्तीर्णही झाली. तिसऱ्या प्रयत्नात तिला हे यश आले. तिने नीटमध्ये ६0३ गुण मिळवले. वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालेली रूपा यादव आता वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेईल आणि काही वर्षांनी ती डॉक्टर झालेली असेल.
तिचा नवरा आणि दीर शेती करतात. पण लग्नानंतर दिराने दिलेल्या पाठिंब्यामुळे मी इतकी शिकू शकले, असे रूपा सांगते. दहावीत मला ८४ टक्के गुण मिळाल्यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनीही शिक्षण सुरूच ठेवण्यासाठी आग्रह धरला. त्याला सासरच्यांनीही मान्यता दिली. त्यामुळे माझे शिक्षण सुरू राहिले.
दहावीनंतर तिने गावापासून ६ किलोमीटर अंतरावरील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अभ्यास आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत तिने अकरावी आणि बारावीची परीक्षा दिली तिला अकरावीत ८१ टक्के तर बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळाले. त्याच दरम्यान रूपाचे काका भीमराव यादव यांना हृदयविकाराचा झटका आला. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. तेव्हाच रूपाने आपण डॉक्टर व्हायचे, असा निर्धार केला. रूपाला कोटा येथे परीक्षेच्या तयारीसाठी जायचे होते. पण आर्थिक अडचणींमुळे तिला बाहेर शिक्षण घेणे शक्य नव्हते. यावेळी एका शिक्षण संस्थेने तिला फीच्या काही टक्के शिष्यवृत्ती दिली आणि कॉलेजच्या वसतीगृहात राहण्याची सोयही केली.
सासरच्या मंडळींनी माझा मुलीप्रमाणे सांभाळ केला आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. घरची शेती असली तरी त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने माझ्या शिक्षणासाठी मदत म्हणून माझा नवरा टॅक्सीही चालवू लागला, असे रूपाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
आनंदीबार्इंची आठवण
रूपा यादवची ही कथा डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारी आहे. डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असलेल्या आनंदीबार्इंचा विवाहही वयाच्या नवव्या वर्षी झाला होता. आनंदीबार्इंनी अमेरिकेत जाऊन वयाच्या २१ व्या वर्षी ‘ए.डी.’ ही डॉक्टरकीची पदवी घेतली. रूपाप्रमाणे त्यांना प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा द्यावी लागली नव्हती. पण आता रूपा जे करते आहे ते आनंदीबार्इंनी १३१ वर्षांपूर्वी केले होते.