देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच; रुग्णांचे हाल कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 09:28 AM2019-06-17T09:28:18+5:302019-06-17T09:28:46+5:30
सर्व दवाखाने, नर्सिंग होम्स आणि रुग्णालयातील रुटीन सेवा बंद राहतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदा बनविण्याची गरज आहे.
नवी दिल्ली - देशभरात सुरु असलेला डॉक्टरांचासंप आज सोमवारी पुन्हा सुरु राहणार आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल कायम राहणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानंतर देशातील 5 लाख डॉक्टरांनीसंपात सहभाग घेतला आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनचे 18 हजार डॉक्टरही संपावर आहेत. डॉक्टर संपावर गेल्याने हॉस्पिटलमधील रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या संपात सहभाग न घेतल्याने एम्सच्या रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांसोबत झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध करत संप पुकारला आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवांना बाधा न पोहचता संप करण्याचं आवाहन डॉक्टरांना केलं आहे. रविवारी रात्री उशीरा केलेल्या आवाहनात म्हटलं आहे की, सर्व दवाखाने, नर्सिंग होम्स आणि रुग्णालयातील रुटीन सेवा बंद राहतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदा बनविण्याची गरज आहे. रुग्णालयांना सुरक्षा ठिकाणांच्या यादीत समाविष्ट करुन डॉक्टरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी संपकरी डॉक्टरांनी केली आहे.
गेल्या मंगळवारपासून पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टर संपावर आहेत. कोलकातामधील एनआरएस मेडिकल कॉलेज रुग्णालयात 75 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यावरुन रुग्णाच्या नातेवाईकांनी गदारोळ करत डॉक्टरांना मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आयएमएचे सर्व डॉक्टर शांतता मार्गाने आंदोलन करत आयएमएच्या मुख्यालयाला उपस्थित राहतील.
पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र बंद दरवाजाआड कोणतीही चर्चा नको अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपकरी डॉक्टरांमध्ये चर्चा होणार आहे. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे देशभरातील तीन लाख, तर राज्यातील ४३ हजार खासगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार नाहीत. परिणामी, सोमवारी राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांतील आरोग्यसेवेवर ताण येण्याची शक्यता आहे.