जिवाशी खेळ; डॉक्टरची रिसेप्शनिस्ट करायची ऑपरेशन; आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:52 AM2023-11-18T10:52:13+5:302023-11-18T10:52:23+5:30
पोलिसांकडून दुसऱ्या डॉक्टरचा शोध सुरू
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी ग्रेटर कैलास येथून दोन डॉक्टर आणि दोन बनावट डॉक्टरांना अटक केली आहे. त्यांच्या दवाखान्यात कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जिवाशी खेळले जात होते. शस्त्रक्रियेनंतर ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यातील एमबीबीएस डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी चक्क ऑपरेशन करीत होती, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रसूतीसाठीच्या शस्त्रक्रिया करत होता. या घोटाळ्यात आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या ‘शस्त्रक्रिया घोटाळ्या’त फरिदाबादमधील आणखी एका डॉक्टरचा सहभाग असण्याची शक्यता दिल्ली पोलिस तपासत आहेत.
या प्रकरणात अनेक डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गुरुवारी अग्रवाल मेडिकल सेंटर चालवणारे नीरज अग्रवाल आणि जसप्रीत सिंग (दोन्ही एमबीबीएस डॉक्टर), अग्रवाल यांची पत्नी पूजा आणि माजी प्रयोगशाळा तंत्रज्ञ महेंद्र सिंग यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासात काय समोर?
अग्रवालच्या घराची आणि क्लिनिकची झडती घेतली असता स्लिप, प्रतिबंधित औषधे, सुया जप्त करण्यात आल्या. या स्लिप्समध्ये वरच्या बाजूला मोकळी जागा सोडून फक्त डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या होत्या. क्लिनिकमध्ये गर्भपात झालेल्या रुग्णांचा तपशील रजिस्टरमध्ये होता.
दुर्लक्ष महागात...
२०१६ पासून दिल्ली मेडिकल कौन्सिलकडे अग्रवाल मेडिकल सेंटर, नीरज आणि पूजा अग्रवाल यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये कथित निष्काळजीपणामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला होता.
कोणती ऑपरेशन केली?
बनावट डॉक्टरांनी पित्ताशयातील खडे काढण्यासाठी आणि सिझेरियन प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया केल्या. बनावट डॉक्टरांनी पित्ताशयातील खडे काढण्यासाठी आणि सिझेरियन प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया केल्या.