बापरे! रुग्णाच्या पोटात आढळली तब्बल 187 नाणी, डॉक्टर चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 04:37 PM2022-11-30T16:37:12+5:302022-11-30T16:38:04+5:30
Karnataka Schizophrenia Patient: रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या. ज्यावेळी एंडोस्कोपी (Endoscopy) करण्यात आली. त्यावेळी रुग्णाच्या पोटात अनेक नाणी असल्याचे आढळून आले.
कर्नाटकातील (Karnataka) बागलकोटमध्ये (Bagalkote) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हनागल श्री कुमारेश्वर रुग्णालयाच्या (Hanagal Shree Kumareshwar Hospital) डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून जवळपास 187 नाणी काढली आहेत. रुग्णाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या. ज्यावेळी एंडोस्कोपी (Endoscopy) करण्यात आली. त्यावेळी रुग्णाच्या पोटात अनेक नाणी असल्याचे आढळून आले. त्यानंतर ऑपरेशन करून रुग्णाच्या पोटातून एक, दोन आणि पाच रुपयांची वेगवेगळी नाणी काढण्यात आली. या सर्व 187 नाण्यांची एकूण किंमत 462 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) नावाचा आजार आहे. या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव दयमप्पा हरिजन असल्याचे सांगितले जात आहे. तो रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुरचा रहिवासी आहे. शनिवारी (26 नोव्हेंबर 2022) दयमप्पा यांनी पोटदुखीची तक्रार केली. यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना बागलकोटच्या एस निजलिंगप्पा मेडिकल कॉलेजशी संलग्न एचएसके रुग्णालयात नेले. त्यानंतर रुग्णाच्या लक्षणांच्या आधारे एक्स-रे आणि एंडोस्कोपी करण्यात आली. रुग्णाच्या एब्डोमिनल स्कॅनमध्ये समजले की त्याच्या पोटात अनेक नाणी आहेत. त्यानंतर डॉक्टरांकडून ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दयमप्पा यांनी सांगिल्याप्रमाणे, पूर्वी ते भीक मागायचे. नाणी मिळाली की, ते ती नाणी गिळत असत. त्यानंतर ते पाणी प्यायचे. हे करताना त्याला बरे वाटले. ही नाणी आपल्या पोटात जाऊन अन्नाप्रमाणे पचतील असे दयमप्पा यांना वाटले. गेल्या काही महिन्यांपासून ते नाणी गिळत होते. दरम्यान, दयमप्पा यांच्या पोटातील नाणी काढण्यासाठी जवळपास दोन तास लागले. ऑपरेशनदरम्यान प्रत्येक वेळी सुमारे पाच नाणी बाहेर काढण्यात आली. दयमप्पा यांनी 187 नाणी गिळली होती. यामध्ये पाच रुपयांची 56 नाणी, दोन रुपयांची 51 नाणी आणि एक रुपयांची 80 नाणी होती, असे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टर ईश्वर कलबुर्गी यांनी सांगितले की, तपासणीत डॉक्टरांना त्यांच्या पोटात अनेक नाणी आढळली. ते म्हणाले की, एक नाणे असते तर आम्ही एंडोस्कोपीद्वारे काढले असते, परंतु अनेक नाणी असल्याने आम्हाला रुग्णाचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशननंतर रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच, आपल्या कारकिर्दीतील ही एक अनोखी केस होती, असेही डॉक्टर म्हणाले.