डॉक्टरांची कमाल! महिलेच्या पोटातून काढली फुटबॉलएवढी मोठी गाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:36 AM2022-09-06T09:36:21+5:302022-09-06T09:37:40+5:30
या 32 वर्षीय महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे फुटबॉलच्या आकाराची गाठ (ट्यूमर) काढली आहे. या दुर्मिळ मेसेंटरिक गाठीचे वजन 4 किलो आहे.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील सीके बिर्ला रुग्णालयात एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी पोटदुखीने ग्रस्त असलेल्या एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या 32 वर्षीय महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे फुटबॉलच्या आकाराची गाठ (ट्यूमर) काढली आहे. या दुर्मिळ मेसेंटरिक गाठीचे वजन 4 किलो आहे.
मूळची नेपाळची असलेली ही महिला पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार करत सीके बिर्ला रुग्णालयात दाखल झाली होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या पोटात 4 किलो वजनाचा आणि 40 सेमी इतकी मोठी गाठ आढळून आली. अशा स्थितीत डॉक्टरांनी कीहोल (Keyhole) लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे ही मोठी गाठ काढण्याचा निर्णय घेतला. यानुसार, महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला होणारा त्रासही कमी झाला आणि रुग्णाच्या पोटावर कोणत्याही खूणा दिसून येत नाहीत.
या महिलेवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणारेसीके बिर्ला रुग्णालयाचे डॉ. अमित जावेद यांनी सांगितले की, गाठीचा आकार मोठा असल्याने ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. गाठ संपूर्ण पोटाच्या पोकळीत पसरली होती, त्यामुळे आम्हाला लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यासाठी ओटीपोटात फारच कमी जागा होती. तसेच, ही गाठ खूप मोठी आणि तिचे वजन होते. त्यामुळे गाठ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे कापून हाताळणे खूप कठीण होते. आता रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून तो सामान्य जीवन जगत आहे, असेही डॉ. अमित जावेद म्हणाले.