न्यायालयीन प्रकरणांची कागदपत्रेच गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:26 AM2018-07-20T03:26:34+5:302018-07-20T03:26:51+5:30
न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.
चेन्नई : न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही कागदपत्रे वेळोवेळी तत्कालीन न्यायाधीश टी. मतिवानन यांच्या निवासस्थानी पाठविली होती. गतवर्षी मेमध्ये ते सेवानिवृत्त झाले. पण त्यांच्याकडून संबंधित खटल्यांच्या फायली परत आलेल्या नाहीत.
न्यायाधीश जी. जयचंद्रन म्हणाले की, न्यायालयातील कागदपत्रांचे गठ्ठे गहाळ झाल्यामुळे न्यायालय चिंतेत आहे. हरवलेल्या कागदपत्रांचे प्रशासकीय पातळीवर पुननिर्माण होऊ शकते. मात्र, सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या निवासस्थानातील १०० खटल्यांची कागदपत्रे परत येत नाहीत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मार्च २०१७ मधील एका प्रकरणात एकाला देण्यात आलेल्या जामिनाच्या आदेशाची सत्यप्रत न मिळाल्याने हे प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे गेले तेव्हा त्यांनी कागदपत्रे पुन्हा तयार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच हे प्रकरण न्या. जयचंद्रन यांच्याकडे सोपविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
>आदेशांच्या प्रती उपलब्धच नाहीत
ंहे प्रकरण मंगळवारी जेव्हा सुनावणीसाठी आले तेव्हा न्यायाधीशांसमोर हे स्पष्ट करण्यात आले की, यापूर्वीच्या न्यायाधीशांनी राखून ठेवलेल्या अथवा आदेश दिलेल्या प्रकरणांच्या प्रती अद्याप पाहायला मिळाल्या नाहीत. न्या जयचंद्रन यांनी सांगितले की, न्या. मतिवानन यांनी राखून ठेवलेल्या १०० प्रकरणांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता न्यायालयाने याची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.