प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:23 AM2024-06-25T07:23:07+5:302024-06-25T07:25:47+5:30

पथक दिल्लीहून पाटण्याला : आरोपींना पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्याची शक्यता 

Documents regarding question paper splitting to CBI | प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी

प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी

एस. पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘सीबीआय’चे पथक दिल्लीहून पाटण्याला आले व बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाशी (इओयू) संपर्क केला. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे व आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल ‘इओयू’ने ‘सीबीआय’ला सुपूर्द केला आहे. नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘सीबीआय’कडे तपासासाठी देण्यात आल्याची अधिसूचना गृह खात्याने जारी केली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी दिल्ली येथे नेले जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यापूर्वी त्यासंदर्भातील सर्व माहिती सीबीआय पथकाने ‘इओयू’कडून जाणून घेतली. प्रश्नपत्रिकांच्या प्रतींची साठवणूक, त्यांची वाहतूक तसेच त्या प्रती कोणाच्या हवाली करायच्या याबद्दल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) दिलेल्या सूचनांचा अभ्यास केला असता या सर्व यंत्रणेत अनेक त्रुटी असल्याचे लक्षात येते असे ‘इओयू’ने म्हटले आहे. 

नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडण्यामागे संजीव मुखिया या आरोपीचा हात असण्याची शक्यता आहे या निष्कर्षाप्रत इओयू आली आहे. मुखिया हा नालंदाचा रहिवासी आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर ती सोडवून उत्तरपत्रिकेच्या प्रती लर्न बॉइज प्ले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. हे काम आरोपी बलदेव ऊर्फ चिंटू याने केले होते. तो संजीव मुखियाचा साथीदार आहे.

पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा होऊ शकतो दाखल

  • ‘इओयू’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पाटणा येथे न्यायालयीन कोठडीत आहेत.
  • या आरोपींचा ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन ‘सीबीआय’चे पथक या आरोपींना चौकशीसाठी दिल्लीला घेऊन जाण्याची शक्यता आहे.
  • पुरावे नष्ट करणे व अन्य काही आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात असे ‘इओयू’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
  • अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील सिकंदर प्रसाद यादव हा दानापूर नगरपरिषदेत कनिष्ठ अभियंता असून, त्याच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल 
  • होऊ शकतो. त्याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Documents regarding question paper splitting to CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.