पोलिसांना चकवा देत अमृतपाल सिंग नेपाळला?; भारतीय दूतावासाने पाठवले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:06 AM2023-03-28T09:06:21+5:302023-03-28T09:06:55+5:30
काठमांडू येथील भारतीय दूतावासाने शनिवारी नेपाळच्या मुत्सद्दी सेवा विभागाला एक पत्र पाठविले आहे.
काठमांडू : फरार फुटीरवादी अमृतपाल सिंग याला तिसऱ्या देशात जाण्याची मुभा देऊ नका. त्याने भारतीय अथवा इतर कोणताही पासपोर्ट वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याला लगेच अटक करा, अशी विनंती भारताने शनिवारी नेपाळला केली. या घडामोडींमुळे अमृतपाल पोलिसांना चकमा देऊन देशाबाहेर निसटण्यात यशस्वी झाल्याचे संकेत मिळत आहेत.
काठमांडू येथील भारतीय दूतावासाने शनिवारी नेपाळच्या मुत्सद्दी सेवा विभागाला एक पत्र पाठविले असून, त्यात अमृतपालने पलायनाचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करावी, अशी विनंती नेपाळच्या सरकारी यंत्रणांना करण्यात आली आहे, असे वृत्त ‘काठमांडू पोस्ट’ या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. ‘सिंग सध्या नेपाळमध्ये लपून बसला आहे,’ असे या वृत्तपत्राने भारतीय दूतावासाच्या पत्राचा हवाला देत म्हटले आहे. अमृतपालचा सुरक्षारक्षक जौहल याला अटक करण्यात आली आहे.
टाइम्स स्क्वेअरवर फोटो
अमृतपाल सिंगच्या समर्थनार्थ अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर खलिस्तान समर्थकांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली. ‘एलईडी मोबाइल बिलबोर्ड’ ट्रकवर अमृतपाल सिंग याची छायाचित्रे लावण्यात आली होती.