केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का? ईडी चौकशीवरुन भाजपचा अरविंद केजरीवाल यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:34 PM2023-11-02T14:34:46+5:302023-11-02T14:35:22+5:30
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलविले होते, केजरीवाल यांनी ईडीच्या नोटीसीवर उत्तर दिले आहे. यामध्ये ईडीने ही नोटीस त्वरीत मागे घ्यावी, असे म्हटले आहे. तसेच केजरीवाल ईडीच्या चौकशीला जाणार नसून ते मध्य प्रदेशच्या सिंगरौलीमध्ये निवडणूक प्रचाराला जाणार आहेत, यावरुन आता भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निशाणा साधला आहे.
केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती
भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी ईडीसमोर हजर न झाल्याचा खरपूस समाचार घेतला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोणावर विश्वास नाही का? त्यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का?, असा सवाल त्यांनी केला.
संबित पात्रा म्हणाले, अरविंद केजरीवाल पळून गेल्याचे तुम्ही टीव्हीवरून पाहत असाल. अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सपासून पळ काढत आहेत, सत्याला सामोरे जाण्यापासून ते पळत आहेत. तपासापासून पळ काढणे म्हणजे माझ्याकडून चूक झाली हे मान्य करण्यासारखे आहे. ईडीसमोर हजर न होणे म्हणजे एक प्रकारे भीती दाखवणे, होय, माझ्याकडून चूक झाल्याचे मान्य करणे.
दिल्ली मद्य घोटाळ्याला अरविंद केजरीवाल थेट जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. संबित पात्रा म्हणाले, केजरीवाल हे या घोटाळ्याचे किंगपीन आहेत, होय, मद्य घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचे केजरीवाल यांनी मान्य केले आहे. या धोरणात झालेल्या सर्रास भ्रष्टाचारात सहभाग आहे. नाहीतर त्यांना घाबरायची काय गरज होती?
सुप्रीम कोर्टाचा उल्लेख करत भाजपने आप नेत्यांवरही निशाणा साधला. पात्रा म्हणाले, अवघ्या ३ दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन फेटाळला आणि दारू घोटाळा अनेक हजार कोटींचा असल्याचे सांगितले. पूर्वी केजरीवाल शीला दीक्षित यांनी भ्रष्टाचार केला, रॉबर्ट वाड्रा यांनी भ्रष्टाचार केला, लालूप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार केला असे रोज म्हणायचे पण आज त्यांनी या सर्वांशी युती केली आहे.
आज भारताची तपास यंत्रणा तुम्हाला समन्स बजावत असताना तुम्ही पळून जात आहात. तुम्हाला भ्रष्टाचाराचे मूळ म्हटले आहे. तुम्ही कायद्याच्या वर आहात का? असंही संबित पात्रा म्हणाले.