"हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे RSS ला वाटते का?"; केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:45 IST2025-01-01T16:43:27+5:302025-01-01T16:45:26+5:30
माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत.

"हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे RSS ला वाटते का?"; केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल
Delhi Vidhan Sabha Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील राजकारण ढवळून निघालं आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही सवाल केले आहेत. भाजपच्या राजकारणाबद्दल केजरीवालांनी प्रश्न विचारले आहेत.
निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीत राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याचा आरोप भाजपवर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अरविंद केजरीवालांचे भागवतांना सवाल
अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजप जे काही चुकीचे करत आहे, त्याला आरएसएसचे समर्थन आहे का?
"भाजपचे नेते उघडपणे पैसे वाटत आहेत, मते विकत घेण्याला आरएसएसचा पाठिंबा आहे का? दलित आणि पुर्वांचलकडील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून गाळली जात आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे आरएसएसला वाटते का? भाजप लोकशाहीला कमकुवत करत आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाहीये का?", प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना केले आहेत.
भाजपचे केजरीवालांना प्रत्युत्तर
अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपने हल्ला चढवला. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी केजरीवालांना पत्र लिहून उत्तर दिले आहे.
"मी आशा करतो की, तुम्ही तुमची खोटं बोलण्याची आणि दिशाभूल करण्याची चुकीची सवय सोडून द्याल आणि तुमच्यात बदल कराल", असे मार्मिक उत्तर भाजपकडून देण्यात आले आहे.
भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही केजरीवालांना लक्ष्य केले. "आरएसएसला पत्र लिहू नका, तर त्याच्याकडून शिका. सेवेचे व्रत घ्या. राजकीय चाली चालणं बाजूला ठेवा", असे म्हणत त्रिवेदींनी केजरीवालांना भागवतांना लिहिलेल्या पत्रावरून टोला लगावला.