US व्हिसा मुलाखतीच्या आधी बोटाचे ठसे घेतात का?
By admin | Published: May 31, 2017 12:02 PM2017-05-31T12:02:31+5:302017-05-31T12:02:31+5:30
व्हिसा मुलाखतीच्या आधी सगळ्या अर्जदारांच्या बोटांचे ठसे घेण्यात येतात. वय वर्ष 14 पेक्षा कमी वयाची मुले आणि 79 वयापेक्षा वृद्ध यांचे मात्र बोटांचे ठसे घेण्यात येत नाहीत
Next
>प्रश्न - मी व्हिसासाठी अर्ज करत आहे. माझ्या बोटांचे ठसे घेण्यात येतील का?
उत्तर - होय, व्हिसा मुलाखतीच्या आधी सगळ्या अर्जदारांच्या बोटांचे ठसे घेण्यात येतात. वय वर्ष 14 पेक्षा कमी वयाची मुले आणि 79 वयापेक्षा वृद्ध यांचे मात्र बोटांचे ठसे घेण्यात येत नाहीत. प्रवासी व्हिसा असो, विद्यार्थी व्हिसा असो वा इमिग्रंट व्हिसा, सगळ्यांना हे लागू होतं. व्हिसा मुलाखतीच्या वेळेबरोबरच, बायोमेट्रिकची वेळही तुम्ही घेऊन ठेवायला हवी. त्यावेळी तुमच्या बोटांचे ठसे तसेच फोटो घेतले जातात. या दोन्हीसाठींची अपॉइंटमेंट www.usatraveldocs.com.in येथे घेता येईल.
भारतातल्या कुठल्याही व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरमध्ये (व्हिएसी) बोटांचे ठसे तुम्ही देऊ शकता. मुलाखतीच्या आधी 45 दिवसांपर्यंत व्हिएसीची अपॉइंटमेंट घेता येते, परंतु अनेकजणांना मुलाखतीच्या आदल्या दिवशी वकिलात किंवा कौन्सुलेटमध्ये बोटांच्या ठशांसाठी अपॉइंटमेंट घेणं सोयीचं वाटतं.
बायोमेट्रिक अपॉइंटमेंटच्या वेळी तुम्ही व्हिएसीमध्ये ठरलेल्या वेळी जा, त्यावेळी कन्फर्मेशन लेटर आणि व्हिसासाठी लागणारी अन्य कागदपत्रे सोबत ठेवा. दहाही बोटांचे ठसे घेणं आणि फोटो काढणं, ही प्रक्रिया फारच लवकर पार पडते. बोटांचे ठसे डिजिटल स्कॅनरवर घेतले जातात. तुमच्या अर्जात दिलेली माहिती बरोबर आहे ना याची खातरजमा केली जाते आणि तुमच्याकडे आवश्यक ती सगळी कागदपत्रं आहेत ना हे बघितलं जातं. त्यामुळे तुमच्या व्हिसासाठीच्या मुलाखतीमध्ये वेळेचा अपव्यय टाळता येतो. व्हिसा मुलाखतीच्या वेळी तुमच्या बोटांचे ठसे आणि फोटो व्हेरीफाय केले जातात, आणि योग्य व्यक्तिचीच मुलाखत घेतली जात आहे वा, याची खात्री केली जाते.