तुमच्याही बाळाला जेवताना माेबाईल हवा? मग सतर्क व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:28 PM2024-05-24T12:28:38+5:302024-05-24T12:29:10+5:30
सतत माेबाईलची मागणी, न दिल्यास आईबाबांना मारतात; फाेनकडे बघत जेवल्याने अन्नही अंगी लागत नाही
नवी दिल्ली : दोन वर्षांचा मोहन दूध पिण्यास आणि जेवण करायला नकार देत होता. आईने त्याच्या हातात मोबाइल दिला अन् लगेच तो खायला तयार झाला. मात्र यामुळे मोहन ६ महिन्यांमध्येच चिडचिडा झाला. तो सतत मोबाइल मागतो आणि रडत राहतो. मोबाइल न दिल्यास आई-वडिलांना मारण्याचा प्रयत्न करतो. ही बाब फक्त मोहनच्या बाबतीच नव्हे तर, अनेक लहान मुलांमध्ये आहे. रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये अशा मुलांची संख्या वाढली आहे.
मुलांची सवय कशी मोडाल?
- मुलांना टीव्ही आणि मोबाइल दाखवून खाऊ घालू नका.
- जेवणासाठी मुलांना १५ ते ३० मिनिटे द्या
- एकत्र बसून जेवण करा
- सुरुवातीला मुलगा रागावेल, पण हळूहळू त्याची सवय बदलेल
मुलाचे समाधान होत नाही
जेवण पाहिल्यानंतर मेंदूमध्ये लहरी निर्माण होतात. न्युरॉन्समुळे तोंड, पोट आणि आतड्यांमध्ये पाचक रस, लाळ बाहेर पडते. त्यामुळे जेवण चांगले पचते.
मोबाइल फोनकडे बघत खाल्ल्याने जेवणावर लक्ष केंद्रित राहत नाही. मुले जेवणावर समाधानी होत नाहीत. मूल फक्त खात राहते, त्यामुळे वजन वाढते.
१०० पैकी ५० मुलांना मोबाइलचे व्यसन लागले होते, असे सर्वेक्षणात समाेर आले.
मुलांच्या पचनावर परिणाम
- पबमेडमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, मोबाइल फोन पाहत जेवणाऱ्यांना मुलांना आपल्याला किती भूक लागली आहे हे लक्षात येत नाही.
- तो कमी अधिक खात राहतो. त्याने काय खाल्ले हेही त्याला आठवत नाही. ते जेवण कमी चावतात.
स्क्रिन टाईम जितका वाढेल तितका धोका जास्त वाढेल. मुलगा जे काम करत आहे ते पूर्ण लक्ष देऊन करत आहे का यावर लक्ष ठेवा. फक्त जेवणच नाही तर दैनंदिन दिनचर्येसाठीही हा नियम लागू करा.
- डॉ. मंजूषा गोयल, बालरोगतज्ज्ञ