भटक्या कुत्र्याची दहशत! 2 तासांत 40 जणांवर केला हल्ला; रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्ड फुल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 04:01 PM2022-12-30T16:01:29+5:302022-12-30T16:08:52+5:30
दोन तासांत भटक्या कुत्र्याने चावा घेऊन 40 जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राजस्थानच्या बाडमेरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक कुत्रा चावण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता कल्याणपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तासांत भटक्या कुत्र्याने चावा घेऊन 40 जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं. एवढ्य़ा मोठ्या संख्येने लोक उपचारासाठी दाखल झाल्याने इमर्जन्सी वॉर्ड देखील भरला आहे.
कुत्र्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणपुरा येथील मानक हॉस्पिटलजवळ एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकामागून एक 40 जणांना चावा घेऊन जखमी केलं. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात आणलं असता व्यवस्थापनही हैराण झालं. त्यानंतर या घटनेची माहिती नगर परिषदेला देण्यात आली आणि कुत्र्याला पकडण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने भटक्या कुत्र्याला पकडण्यात आलं. नगर परिषदेने आता शहरातील विविध भागातील भटकी कुत्री पकडण्याची योजना तयार केली आहे. अचानक भटक्या कुत्र्याने चावलेल्या अनेक जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बीएल मन्सूरिया यांनी सांगितलं .
पिसाळलेला कुत्रा शहरातील अनेक भागात फिरतोय आणि त्याने शहरात विविध ठिकाणी अनेक जणांना चावून जखमी केलं आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबाबत नगर परिषदेला अनेकदा सांगण्यात आले, मात्र कुत्र्याला पकडण्याबद्दल कारवाई झाली नाही, त्यामुळे ही मोठी घटना घडली, असं नागरिकांनी म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"