कुत्रा चावलाय? तुम्हाला मिळतील १० हजार रुपये; पंजाब अन् हरयाणा न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 08:42 AM2023-11-16T08:42:10+5:302023-11-16T11:15:08+5:30
कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या निशाणीसाठी १० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिले.
चंडीगड : भटक्या कुत्र्यांचा देशभरात सर्वत्रच त्रास आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. परंतु भटक्या कुत्र्यांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीला भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या निशाणीसाठी १० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिले.
भटक्या आणि मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी आणि मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याबाबत दाखल १९३ याचिकांवर न्यायमूर्ती विनोद भारद्वाज यांच्या खंडपीठापुढे एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दिशानिर्देश जारी केले.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती
उच्च न्यायालयाने पंजाब, हरयाणा आणि चंडीगड प्रशासनाला दिलेल्या आदेशात, भटक्या कुत्र्यांसह अन्य जनावरांमुळे जखमी झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करावी. पोलिसांकडून अहवाल मिळाल्यानंतर आणि योग्य कागदपत्रे दाखल केल्यानंतर पीडितांना नुकसानभरपाईची रक्कम ४ महिन्यांमध्ये देण्यात यावी, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. नुकसानभरपाई देण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकार संबंधित घटनेत चावा घेणाऱ्या वा नागरिकांना जखमी करणाऱ्या जनावराच्या मालकाकडून नुकसानभरपाई वसूल करू शकते. परंतु नुकसान भरपाई देण्यात राज्य सरकारने टाळाटाळ करू नये, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
काय म्हणाले न्यायालय?
-भटक्या जनावरांमुळे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने आणि विनाविलंब तक्रार दाखल करून घ्यावी.
-पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेची सत्यता तपासावी आणि त्यावरून सविस्तर अहवाल तयार करावा.
-पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.