पाहुणे डोनाल्ड ट्रम्प येती घरा; कुत्रे, नीलगायी 'गायब' करा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:03 AM2020-02-17T11:03:29+5:302020-02-17T11:05:29+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीआधी प्रशासन लागलं कामाला
अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पभारत दौऱ्यावर येत आहेत. यासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये विशेष तयारी सुरू आहे. ट्रम्प फक्त तीन तास अहमदाबादमध्ये असतील. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये मोठी लगबग सुरू आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत, यासाठी झोपड्यांसमोर भिंत बांधण्यात आल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता ट्रम्प यांच्या वाटेत कुत्रे, नीलगायी येऊ नयेत, यासाठीही विशेष काळजी घेतली जात आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये असतील. त्यांच्या तीन तासांच्या दौऱ्यावर १०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या वाटेत कुत्रे, नीलगायी येऊ नयेत, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. लोकांनी पान खाऊन भिंतीवर थुंकू नये, यासाठी पानाच्या गाद्यादेखील बंद करण्यात आल्या आहेत.
२०१५ मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अहमदाबादमधील प्रशासकीय यंत्रणेनं कंबर कसली आहे. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी 'वायब्रंट गुजरात'मधील कार्यक्रम आटपून विमानतळाच्या दिशेनं परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारसमोर अचानक एक कुत्रा आला. केरी यांच्या कारनं कुत्र्याला धडक दिली. त्यामुळे प्रशासनावर मोठी नामुष्की ओढावली. याची पुनरावृत्ती होऊ टाळण्यासाठी आज पशुपालन विभागानं बैठक बोलावली आहे. कुत्र्यांसह इतर प्राण्यांना व्हीव्हीआयपी मार्गांपासून दूर ठेवण्यासाठीची योजना या बैठकीत आखली जाऊ शकते.
विमानतळापासून स्टेडियमकडे जाण्यासाठी रस्त्यानं एक किलोमीटर प्रवास करावा लागतो. या भागात नीलगायींची संख्या लक्षणीय आहे. नीलगायी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून वन विभागाची तयारी सुरू आहे. व्हीव्हीआयपी मार्गापासून कुत्रे, नीलगायी आणि इतर प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी अहमदाबाद महापालिकादेखील कामाला लागली आहे. मोकाट प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिका एक विशेष पथक तैनात करणार आहे.