'डोकलाम'सारखे आणखी प्रयत्न करू शकतो चीन, जवानांना सज्ज राहण्याच्या सूचना : लष्करप्रमुख बिपिन रावत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 08:22 AM2017-08-27T08:22:16+5:302017-08-27T08:24:43+5:30
भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे, दि. 27 - ‘‘भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जवानांना दिल्या आहेत,’’ असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे जनरल बी. सी. जोशी मेमोरिअल व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. ‘वर्तमानातील भू-सामरिक स्थितीतील भारतासमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एन. हॅरिस, संरक्षण आणि सामरिक विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, उपस्थित होते.
रावत म्हणाले, की दहशतवाद आणि कट्टरतावाद वेगाने वाढत आहेत. आशिया खंड जगाचे केंद्र बनत आहे. जगात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन राजकीय, आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही देशांत डोकलाम प्रश्नावरून तणावपूर्ण वातावरण आहे. सीमा अस्पष्ट असल्याने चीन अनेक भागांवर मालकी हक्क सांगत आहे. त्यामुळेच भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा होऊ शकतात. फाळणी आणि वसाहतवादी धोरणामुळे काश्मीरप्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तान छुप्या युद्धाद्वारे काश्मीर अशांत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कट्टरपंथीय छुप्या पद्धतीने मदत करीत आहेत. देशातील आंतरिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा घटकांना नष्ट करणे महत्त्वाचे असल्याचेही रावत यांनी सांगितले.
चीन आणि भारतातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करांचा संयुक्तिक सराव घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी भारताने चीनच्या सैनिकांना सरावासाठी आमंत्रित केले होते. या वर्षी चीनकडून हा प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कुठलेच निमंत्रण आलेले नाही. - बिपिन रावत, लष्करप्रमुख.